Kitchen Sponge Bacteria : भांडी स्वच्छ करण्यासाठी बहुतांश घरांमध्ये स्पंजचा वापर केला जातो. पण, हा छोटासा स्पंज तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? किचनमधील स्पंजमध्ये मोठ्या संख्येने जीवाणू (बॅक्टेरिया) असू शकतात. जेव्हा तुम्ही स्पंजने खरकटी भांडी साफ करता, तेव्हा वेळेनुसार त्यावर तेल आणि तेलकटपणा जमा होतो. याशिवाय भांडी धुताना अन्नाचे छोटे तुकडेही त्यात अडकतात. त्यानंतर जेव्हा स्पंज पाण्याने धुतला जातो, तेव्हा तो कित्येक तास ओलाच राहतो. या सर्व गोष्टींमुळे स्पंज बॅक्टेरियाचे घर बनतो.

फूड सेफ्टी तज्ज्ञांच्या मते, भांडी साफ करणाऱ्या स्पंजमध्ये ई. कोलाय (E. coli), स्टॅफिलोकोकस (Staphylococcus) आणि साल्मोनेला (Salmonella) यांसारखे धोकादायक बॅक्टेरिया आढळू शकतात, जे तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे स्पंजऐवजी तुम्ही इतर काही वस्तूंचा वापर करू शकता.

डिश ब्रशचा करा वापर

भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्पंजऐवजी डिश ब्रश वापरू शकता. स्पंजच्या तुलनेत ब्रशमध्ये पाणी साचून राहत नाही आणि तो लवकर सुकतो. तसेच ब्रशमध्ये अन्नाचे तुकडेही अडकून राहत नाहीत. ब्रशवर घाण जमा झाल्यास ती सहज दिसते आणि साफही करता येते.

डिश ब्रश कसा स्वच्छ ठेवावा?

ब्रशही स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. भांडी धुतल्यानंतर रोज थोडा वेळ ब्रश गरम पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर साबणाच्या पाण्याने ब्रश व्यवस्थित धुवा. धुतल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवा जिथून पाणी सहज निघून जाईल आणि तो पूर्णपणे सुकेल. ब्रशच्या केसामध्ये घाण साचू लागली, केस खराब झाले किंवा ब्रश खूप घाणेरडा दिसू लागला तर तो बदलणे योग्य ठरेल.

सिलिकॉन स्पंज वापरा

आजकाल बाजारात सिलिकॉनपासून बनवलेले स्पंज मिळतात. साध्या स्पंजच्या तुलनेत यामध्ये चिकटपणा आणि घाण कमी जमा होते. तसेच या स्पंजमध्ये पाणी जास्त वेळ राहत नाही, त्यामुळे भांडी साफ करण्यासाठी सिलिकॉन स्पंज उत्तम पर्याय आहे. वापरल्यानंतर तो धुवून चांगला सुकवून घ्यावा.

सिंक स्वच्छ करण्यासाठी कपड्याचा वापर करा

अनेक जण सिंक, किचन ओटा आणि गॅसभोवतालची जागा साफ करण्यासाठीही तोच स्पंज वापरतात. यामुळे संपूर्ण किचनमध्ये बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. या जागा स्वच्छ करण्यासाठी कपड्याचा वापर करा. यासाठी सुती (कॉटन), लिनेन किंवा प्लांट सेल्युलोजपासून बनवलेला कपडा वापरू शकता. वापरल्यानंतर कपडा चांगला धुवून गरम तापमानात सुकवा. ओला कपडा जास्त वेळ गुंडाळून ठेवू नका, अन्यथा त्यातही बॅक्टेरिया वाढू शकतात.

स्पंजच वापरायचा असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला स्पंजनेच भांडी धुणे आवडत असेल तर त्याच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्या:

स्पंज वापरल्यानंतर गरम पाण्याने चांगला धुवा. त्यातील अन्नाचे कण आणि तेल काढून टाका, त्यानंतर स्पंजमधील सर्व पाणी पिळून घ्या.

स्पंज जास्त वेळ सिंकमध्ये किंवा ओल्या जागेवर ठेवू नका. तो हवेशीर ठिकाणी ठेवा, जेणेकरून तो लवकर सुकेल.

स्पंज ओला असताना थोडा वेळ मायक्रोवेव्हमध्ये ठेवून सुकवू शकता. मात्र, सुका स्पंज कधीही मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नका, आगीचा धोका असू शकतो.

किती दिवसांत स्पंज बदलावा?

किचनमधील स्पंज दर ७ ते १० दिवसांत बदलावा. याशिवाय स्पंजला दुर्गंधी येत असेल, डाग दिसत असतील किंवा तो खूप घासून खराब झाला असेल तर लगेच बदला.