5 monsoon foods that you need to stock up on : प्रत्येक ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करणे गरजेचे असते. त्यानुसार घरासाठी लागणारा किराणा आणि इतर आवश्यक वस्तूही बाजारातून आणाव्या लागतात. त्यामुळे अनेक जण बाजारात जाण्यापूर्वी खरेदीची यादी तयार करून ठेवतात, जेणेकरून आवश्यक वस्तू आठवणीने आपण येताना घेऊन येऊ. काही जण एकाच वेळी मोठ्या प्रमाणात किराणा माल खरेदी करून बाजारात जाण्याची दुसरी फेरी वाचवतात. पण, अगदी जास्त किंवा अगदी कमी सामान आणलं जाणार नाही याचीही काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण- पावसाळ्यात अन्नाची नासाडी होऊन, ते कचऱ्यात जाण्याची शक्यताही वाढते. या ऋतूतील उष्णता आणि दमटपणामुळे नेहमीचे काही खाद्यपदार्थ सामान्यपेक्षा लवकर खराब होतात आणि ते योग्य प्रकारे साठवल्यास काही पदार्थ जास्त काळ टिकू शकतात.
मग, पावसाळ्यात तुमच्या किराणा मालाच्या यादीत काय बदल असायला हवा? याबद्दल दी इंडियन एक्स्प्रेसने ’10on10 Foods’च्या आहारतज्ज्ञ अंजू सूद यांच्या मते, यांच्याशी चर्चा केली. पावसाळ्यात विशिष्ट पदार्थ खरेदी करणे सोडून देण्याएवजी कोणते पदार्थ साठवून ठेवणे योग्य आहे, कोणते पदार्थ कमी प्रमाणात खरेदी करणे चांगले आहे; जेणेकरून नासाडी आणि अन्नातून होणाऱ्या आजारांचा धोका कमी होईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात कोणते पदार्थ साठवून ठेवावे?
काही खाद्यपदार्थ व ताज्या गोष्टी पावसाळ्यासाठी इतर पदार्थांपेक्षा अधिक योग्य असतात. चांगल्या पोषण मूल्यांव्यतिरिक्त योग्य प्रकारे साठवल्यास लवकर खराब होण्याची शक्यताही कमी असते.
१. दळलेले गव्हाचे पीठ
कमी प्रमाणात ताजे दळलेले पीठ हवाबंद डब्यात साठवा. ताज्या दळलेल्या गव्हाच्या पिठातून ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ (जटिल कर्बोदके), फायबर आणि आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात, जी शरीराला दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. पावसाळ्यात दळलेले पीठ कमी प्रमाणात साठवून ठेवा आणि त्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी ओलावा शोषला जाण्यापासून रोखण्यासाठी थंड व कोरड्या जागी हवाबंद डब्यात साठवा.
२. डाळी आणि कडधान्ये
मुगाची डाळ, मसूर डाळ व हरभरा हे वनस्पती-आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत असून, पचायला हलके सुद्धा असतात, ज्यामुळे दमट हवामानात खाणे उत्तम ठरते. त्यांना हवाबंद काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यांमध्ये साठवा. साठवणुकीच्या जागेवर कीड किंवा कीटक येऊ नयेत म्हणून त्यात तमालपत्र किंवा कडुनिंबाची वाळलेली पाने टाका.
३. मसाले
मसाल्यांचा सुगंध व चव दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी अख्खे मसाले उष्णता, ओलावा आणि वाफेपासून दूर हवाबंद डब्यांमध्ये साठवावेत. हळद, ओवा, काळी मिरी आणि आले हे केवळ पदार्थांची चव वाढवत नाहीत. तर त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामध्ये नैसर्गिकरीत्या सूक्ष्मजीवविरोधी (Antimicrobial), दाहशामक (Anti-inflammatory) आणि पचनास मदत करणारे गुणधर्म आढळतात. त्यामुळे हे मसाले केवळ पदार्थांची चव वाढवत नाहीत. तर एकूण आरोग्य राखण्यासही उपयुक्त ठरतात.
४. सुकामेवा आणि बिया
बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, जवस यांतून आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने, आवश्यक सूक्ष्म-पोषक तत्त्वे मिळतात, जी संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. दमट हवामानात त्यातील तेलाचा दर्जा बिघडू शकतो. त्यामुळे त्यांना हवाबंद डब्यात ठेवा आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असाल, तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
५. आंबवलेले पदार्थ
ताजे दही, घरगुती ताक आणि इतर आंबवलेले पदार्थ तुमच्या पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यास मदत करतात, ज्याचा रोगप्रतिकारक शक्तीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. त्यातील फायदेशीर जीवाणू टिकून राहावेत आणि अन्नाची सुरक्षितता कायम राहावी यासाठी आंबवलेले पदार्थ शक्यतो ताजे असतानाच सेवन करा. नंतर खाणार असल्यास ते लगेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत, जेणेकरून त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकून राहील.
कोणते पदार्थ जास्त प्रमाणात खरेदी करू नये?
पावसाळ्यात प्रत्येकच खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यासारखा नसतो. हे पदार्थ लवकर खराब होण्याची किंवा दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही दिवसांत वापरता येतील इतकेच पदार्थ खरेदी करणे चांगले.
१. पालेभाज्या
पावसाळ्यात पालेभाज्या लवकर खराब होतात आणि त्यात धूळ व सूक्ष्मजीव असतात. केवळ एक-दोन दिवसांत वापरता येतील इतक्याच भाज्या खरेदी करा, शिजविण्यापूर्वी त्या नीट धुवा आणि योग्य रीत्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
२. ब्रेड आणि बेकरी उत्पादने
पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेमुळे बुरशीची वाढ होते, ज्यामुळे ब्रेड, बेकरीचे पदार्थ लवकर खराब होतात. लहान पॅकेट्स खरेदी करा आणि जर तुम्ही ते लगेच खाणार नसाल. तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
३. मासे आणि सी-फूड (समुद्री खाद्यपदार्थ)
पावसाळा हा अनेक प्रकारच्या माशांचा प्रजननाचा काळ असल्याने या काळात त्यांचा ताजेपणा आणि गुणवत्ता ओळखणे तुलनेने कठीण ठरू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठा करण्याऐवजी गरजेनुसारच विश्वासार्ह ठिकाणाहून मासे खरेदी करा, ताजे असतानाच त्यांचे सेवन करा आणि दीर्घकाळ साठवून ठेवणे टाळा.
४. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थांची लहान पॅकेट्स खरेदी करा आणि जर तुम्ही ते लगेच वापरणार नसाल, तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. उष्णता आणि आर्द्रता यांच्या एकत्रित परिणामामुळे पावसाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात.
५. ‘रेडी-टू-ईट’ (खाण्यासाठी तयार) सॅलड्स आणि फळे
आधीच कापलेली फळे आणि पॅकबंद सॅलड्सचा टिकण्याचा कालावधी (shelf life) कमी असतो आणि त्यात सूक्ष्मजीवांमुळे ते दूषित होण्याचा धोका जास्त असतो, विशेषतः पावसाळ्यात. त्याऐवजी फळे, भाज्या खरेदी करणे आणि घरीच ताजी सॅलड्स तयार करणे अधिक सुरक्षित असते.
पावसाळ्यात सकस आहाराचा अर्थ केवळ तुम्ही काय खाता एवढाच नसून, अन्न कशा प्रकारे साठवता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. गरजेनुसार खरेदी करणे, ताजे आणि दर्जेदार अन्नघटक निवडणे, तसेच त्यांची योग्य पद्धतीने साठवणूक करणे यांमुळे अन्नातील पोषक तत्त्वे टिकून राहण्यास मदत होते. त्याशिवाय अन्न खराब होण्याचा आणि त्यातून उद्भवणाऱ्या अन्नजन्य आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
