Chopping Board Hygiene & Safety Tips : स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू असतात, ज्यांचा वापर आपण जवळजवळ दररोज करतो. त्यापैकी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे चॉपिंग बोर्ड. भाज्या आणि फळे कापण्यापासून ते चीज, कच्चे चिकन किंवा मांस तयार करण्यापर्यंत अनेक कामांसाठी आपण त्याच बोर्डचा वापर करतो. वापरल्यानंतर तो स्वच्छ धुतलाही जातो. पण, बाहेरून स्वच्छ दिसणारा चॉपिंग बोर्ड आतूनही तितकाच स्वच्छ असतो का? त्यावर चिकटलेले सूक्ष्म जंतू आणि बॅक्टेरिया डोळ्यांना दिसत नसले, तरी ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच चॉपिंग बोर्ड किती वेळा बदलायचा हे देखील तुम्हाला माहित असले पाहिजे.

सर्वात मोठी चूक कोणती?

समजा तुम्ही चॉपिंग बोर्डवर कच्चे चिकन कापले आणि व्यवस्थित स्वच्छ धुतले नाही तर त्यावर जिवाणू वाढू शकतात. त्यामुळे यानंतर तुम्ही त्याच चॉपिंग बोर्डवर सॅलडसाठी काकड्या किंवा टोमॅटो कापले. तर त्या पदार्थांमध्ये सुद्धा जिवाणू पसरू शकतात. म्हणून, कच्चे मांस, सीफूड आणि न शिजवता खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थांसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड ठेवणे ही एक चांगली पद्धत असू शकते.

फक्त पाण्याने धुणे पुरेसे आहे का?

चॉपिंग बोर्ड पाण्याने पटकन धुवून पुन्हा वापरणे ही योग्य स्वच्छता मानली जात नाही. वापरल्यानंतर बोर्ड पूर्णपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. साबण किंवा डिशवॉशिंग लिक्विड आणि स्वच्छ पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. ओला ठेवून लगेच कुठेतरी ठेवून देण्याऐवजी त्याला पूर्णपणे सुकू द्या.

बोर्डवरील कापण्याच्या खुणा महत्त्वाच्या का आहेत?

कालांतराने चॉपिंग बोर्डच्या पृष्ठभागावर चाकूच्या लहान-मोठ्या कापण्याच्या खुणा पडतात. सुरुवातीला या खुणा सामान्य वाटत असल्या, तरी त्या खूप खोल झाल्यास बोर्ड स्वच्छ करणे कठीण होऊ शकते. अशा भेगा किंवा खाचांमध्ये अन्नाचे बारीक कण आणि जंतू साचण्याची शक्यता असते. त्यामुळे बोर्डचा पृष्ठभाग खराब होऊन तो व्यवस्थित स्वच्छ करता येत नसेल, तर नवीन चॉपिंग बोर्ड घेण्याचा विचार करणे योग्य ठरते.

तुम्ही चॉपिंग बोर्ड कधी बदलला पाहिजे?

  • बोर्डचा एखादा भाग तुटला किंवा त्याला तडे गेल्यावर चॉपिंग बोर्ड लगेचच बदला.
  • पृष्ठभाग इतका झिजला आहे की, तो पूर्णपणे स्वच्छ करणे कठीण होऊ शकते.
  • बोर्डला सतत दुर्गंधी येत असेल तर टाकून द्या.
  • लाकडी बोर्डला जास्त तडे गेले आहेत किंवा तो बराच काळ ओलावा धरून ठेवतो.
  • प्लॅस्टिक बोर्डचा पृष्ठभाग इतका झिजल्यावर फेकून द्यावा.

लाकडी की प्लॅस्टिक : कोणता चॉपिंग बोर्ड निवडावा?

चॉपिंग बोर्ड निवडताना केवळ त्याची किंमत किंवा डिझाइन पाहणे पुरेसे नाही. त्याचा पृष्ठभाग सहज स्वच्छ करता येतो आणि वापरल्यानंतर तो लवकर व पूर्णपणे वाळतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास कच्चे मांस किंवा चिकन कापण्यासाठी वेगळा चॉपिंग बोर्ड, तर फळे, भाज्या आणि तयार पदार्थांसाठी दुसरा बोर्ड वापरणे चांगली सवय आहे. यामुळे कच्च्या पदार्थांमधील जंतू इतर अन्नपदार्थांपर्यंत जाण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

चॉपिंग बोर्ड दीर्घकाळ स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे?

वापरानंतर चॉपिंग बोर्ड लगेच स्वच्छ करून पूर्णपणे वाळवणे महत्त्वाचे आहे. तो जास्त वेळ ओलसर अवस्थेत ठेवू नका, कारण ओलाव्यामुळे जंतूंची वाढ होण्याची शक्यता असते. तसेच, बोर्ड दीर्घकाळ वापरणार असाल, तर त्याच्या पृष्ठभागाची स्थिती नियमितपणे तपासत राहा. खूप खोल काप, भेगा किंवा खाचांमध्ये घाण साचत असल्यास बोर्ड बदलण्याचा विचार करा.