How to get celebrity glow: किवी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यात फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम व तांबे यांसारखी पोषक तत्त्वे चांगल्या प्रमाणात असतात. किवीच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, किवीचा वापर फेस पॅक म्हणूनही करता येतो? ज्याप्रमाणे किवीच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात, त्याचप्रमाणे किवीचा फेस पॅक वापरणेदेखील चेहऱ्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
तुम्ही घरी सहजपणे किवीचा फेस पॅक बनवू शकता. त्यामुळे तुमची त्वचा अधिक नितळ आणि तेजस्वी दिसण्यास मदत होते, तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते. किवीमधील व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनच्या निर्मितीस मदत करते. त्वचा निरोगी आणि मजबूत ठेवण्यात कोलेजन महत्त्वाची भूमिका बजावते. किवीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करण्यासही मदत करतात. चला तर मग, हा पॅक कसा बनवायचा आणि कसा लावायचा ते शिकूया.
१ – किवी आणि मधाचा फेस पॅक
जर तुम्हाला कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल, तर तुम्ही किवीमध्ये मध मिसळून फेस पॅक तयार करू शकता. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. हा पॅक तयार करण्यासाठी, अर्धी पिकलेला किवी कुस्करून घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
२ – किवी आणि बेसनचा फेस पॅक
जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर किवी आणि बेसनचा फेस पॅक फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी आणि स्वच्छ दिसते. त्यासाठी एका पिकलेल्या किवीचा गर काढा आणि त्यात एक चमचा बेसन मिसळा. गरजेनुसार तुम्ही थोडे दहीदेखील घालू शकता. त्यामुळे पेस्ट अधिक मऊ होईल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच ठेवा. लेप सुकल्यावर चेहरा पाण्याने हलक्या हाताने धुवा आणि नंतर तुमच्या त्वचेला अनुकूल असे हलके मॉइश्चरायझर लावा.
