Joint Pain Causes In Young Age : कमी वयात गुडघ्यातून कट-कट असा आवाज येणे ही अत्यंत सामान्य बाब बनली आहे. वैद्यकीय भाषेत याला ‘क्रेपिटस’ (Crepitus), असे म्हटले जाते. अनेकदा गुडघे वाकवताना, पायऱ्या चढताना-उतरताना, बसताना किंवा उठताना अशा प्रकारचे आवाज ऐकायला येतात. मात्र, गुडघ्यातून आवाज येण्याचा अर्थ नेहमीच साधा असतो, असे नाही. त्यामागे एखादा आजारही असू शकतो. नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स आणि जॉईंट रिप्लेसमेंटचे चेअरमन डॉ. अतुल मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

गुडघ्यातून कट-कट असा आवाज का येतो?

डॉक्टरांच्या मते, गुडघ्यातून आवाज येण्याचे एक सामान्य कारण म्हणजे सांध्यांमध्ये असलेल्या सायनोवियल फ्लुईडमध्ये (Synovial Fluid) गॅसचे बुडबुडे तयार होणे आणि ते फुटणे. हा द्रवपदार्थ सांध्यांना वंगण (Lubrication) देण्याचे आणि हाडांमधील घर्षण कमी करण्याचे काम करतो. त्याशिवाय गुडघ्याभोवती असलेले टेंडन्स आणि लिगामेंट्स हलल्यामुळे किंवा ते आपल्या जागेवर परत आल्यामुळेही सांधे सरकण्याने असा आवाज येऊ शकतो.

कमी वयात सतत गुडघ्यातून आवाज येण्यामागे इतर काही कारणेही असू शकतात. त्यात मांडीचे स्नायू कमजोर होणे, दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणे, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा आणि चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये गुडघ्याच्या हाडाची हालचाल योग्य प्रकारे न होण्यामुळे किंवा त्याच्या आसपासच्या कार्टिलेजमध्ये बदल झाल्यामुळेही असा आवाज येतो.

जर गुडघ्यातून आवाज येण्याबरोबरच दुखणे, सूज येणे, आळस किंवा चालताना त्रास होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा स्थितीत ऑस्टिओआर्थरायटिस, कार्टिलेजला दुखापत किंवा गुडघ्याशी संबंधित इतर आजारांची तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. गुडघे सक्षम ठेवण्यासाठी नियमितपणे हलकासा व्यायाम करा, मांडी आणि गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करणाऱ्या कसरती करा, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा आणि दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे टाळा.

लक्षात ठेवा की, केवळ गुडघ्यातून कट-कट आवाज येणे म्हणजे नेहमीच एखादा गंभीर आजार असतो, असे नाही; परंतु त्यासह वेदना किंवा सूज असल्यास ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.