Knee Pain: हल्ली गुडघेदुखीची समस्या केवळ वयोवृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तरुणांमध्येही ती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दीर्घकाळ बसून काम करणे, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, चुकीची बसण्याची किंवा चालण्याची पद्धत, तसेच दुखापतीमुळे गुडघ्यांवर ताण येतो. सुरुवातीला जिने चढताना-उतरताना वेदना, सूज किंवा कट् कट्, असा आवाज येणे ही लक्षणे जाणवू शकतात. गुडघ्यांमधील वेदनांमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. खरे तर, गुडघ्यांच्या वेदनेपेक्षा मोठी समस्या म्हणजे त्यावर योग्य ते उपचार न होणे. अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा लोकांना गुडघेदुखी सुरू झाल्यावर तेव्हा त्यांच्याकडून होणाऱ्या ६ चुका खालीलप्रमाणे, ज्यामुळे केवळ वेदनाच वाढत नाहीत, तर गुडघ्यांचे नुकसानही वाढते.
१. गुडघे दुखत असल्यास पूर्णपणे आराम करणे
गुडघेदुखी सुरू झाल्यानंतर अनेक जण हालचाल पूर्णपणे बंद करून, दिवसभर आराम करतात. मात्र, काही दिवसांपेक्षा जास्त काळ पूर्णपणे निष्क्रिय राहिल्यास गुडघ्याभोवतीचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे सांध्यांना कमी आधार मिळतो आणि वेदना आणखी वाढू शकतात. तीव्र वेदना असेल, तर थोडा आराम आवश्यक असतो; परंतु डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांच्या सल्ल्याने हलके व्यायाम आणि नियंत्रित हालचाल सुरू ठेवणे फायदेशीर ठरते.
२. सूज आलेल्या भागावर गरम शेक देणे
गुडघ्याला ताजी दुखापत झाली असेल किंवा सूज आली असेल, तर लगेच गरम शेक देणे योग्य नसते. गरम शेक दिल्यामुळे त्या भागातील रक्तप्रवाह वाढून सूज अधिक वाढू शकते. अशा वेळी सुरुवातीच्या २४ ते ४८ तासांत बर्फाचा शेक देणे अधिक उपयुक्त असते. जुनाट स्नायूंचा कडकपणा किंवा स्नायूंचा ताण असल्यासच तज्ज्ञांच्या सल्ल्याने गरम शेक घ्यावा.
३. जमिनीवर मांडी घालून बराच वेळ बसणे
दीर्घकाळ मांडी घालून बसल्यामुळे गुडघे पूर्णपणे दुमडलेल्या अवस्थेत राहतात. त्यामुळे सांधे आणि कूर्चावर अतिरिक्त दाब येतो. विशेषतः ज्यांना संधिवात, कार्टिलेजची झीज किंवा आधीपासून गुडघेदुखी आहे, त्यांनी बराच वेळ अशा स्थितीत बसणे टाळावे. शक्य असल्यास खुर्चीवर योग्य पद्धतीने बसण्याची सवय लावावी.
४. पेनकिलर अनेक दिवस सतत घेणे
वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर औषधे उपयोगी ठरू शकतात; पण ती दीर्घकाळ स्वतःहून घेणे धोकादायक ठरू शकते. अशा औषधांमुळे पोटाचे विकार, मूत्रपिंडांवर परिणाम किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्याशिवाय वेदना कमी झाल्या म्हणून मूळ समस्या बरी झाली, असे होत नाही. त्यामुळे औषधे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
५. खाली बसून काम करताना पायांची चुकीची पोजिशन
खाली बसून स्वयंपाक करणे, कपडे धुणे किंवा इतर कामे करताना पाय चुकीच्या कोनात दुमडले जातात. त्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांवर अनावश्यक ताण येतो. वारंवार किंवा दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास वेदना वाढू शकतात. शक्य असल्यास उंच स्टूल, खुर्ची किंवा योग्य आधार वापरून काम करणे अधिक सुरक्षित ठरते.
६. शरीराचे वाढलेले वजन
शरीराचे वजन वाढल्यास त्याचा थेट परिणाम गुडघ्यांवर होतो. चालणे, जिने चढणे किंवा उभे राहणे अशा क्रियांच्या वेळी गुडघ्यांवर शरीराच्या वजनाच्या अनेक पटींनी दाब पडतो. त्यामुळे कार्टिलेजची झीज वेगाने होऊन गुडघेदुखी वाढण्याचा धोका असतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणे या बाबी गुडघे सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
