Knee Pain Warning Signs: गुडघेदुखी होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, काही वेळा गुडघ्यांमध्ये दिसणारी काही लक्षणे गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात. आजकाल अनेक तरुणांनाही कमी वयात गुडघ्यांमधून कट-कट किंवा चटकण्याचे आवाज येऊ लागतात. तर काही जणांना गुडघ्यांना सूज येण्याचा त्रास होतो. अशा वेळी हाडांचे तज्ज्ञ डॉ. देबाशीष चंदा यांनी अशा तीन लक्षणांबद्दल सांगितले आहे, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
रात्री अचानक गुडघ्याला सूज येणे
जर रात्री अचानक गुडघ्याला सूज आल्याचे दिसले, तर सामान्य दुखणे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये. या सूज येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा मेनिस्कसला दुखापत झाल्यानंतर गुडघ्याच्या सांध्याला सूज येऊ शकते. मात्र, अनेकदा दुखापत झाल्यानंतर लगेच सूज दिसून येत नाही. काही तासांनंतर किंवा दुसऱ्या दिवशी गुडघा सुजायला लागतो.
यामुळे गुडघा जड झाल्यासारखा वाटू शकतो. गुडघ्याच्या आजूबाजूला सूज दिसू लागते. गुडघा वाकवताना किंवा जिने चढताना वेदना होतात. तसेच गुडघ्याभोवती ताण आणि आखडल्यासारखे जाणवते.
चालता चालता गुडघा अडकणे किंवा लॉक होणे
मेनिस्कस फाटल्याचे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. जेव्हा मेनिस्कसचा फाटलेला भाग त्याच्या जागेवरून सरकून गुडघ्याच्या सांध्यामध्ये अडकतो, तेव्हा गुडघ्याची नेहमीची हालचाल करण्यात अडथळा येऊ शकतो.
या समस्येमुळे गुडघा पूर्णपणे सरळ करण्यात अडचण येते. चालताना अचानक पाय अडकल्यासारखा वाटतो. गुडघा वाकवताना वेदना होतात किंवा कट-कट असा आवाज येतो. तसेच चालताना, बसताना आणि उठताना त्रास होऊ शकतो.
रात्री अचानक जाग येणे आणि गुडघेदुखीचा त्रास होणे
मेनिस्कसला दुखापत झाल्यानंतर गुडघ्यात सतत वेदना आणि सूज राहू शकते. काही लोकांना रात्री झोपताना कुशी बदलताना किंवा पायाची स्थिती बदलताना वेदना जाणवतात.
मेनिस्कस फाटल्यामुळे गुडघ्याच्या सांध्यावर दबाव येतो. गुडघ्याच्या आतील भागात सूज आणि जळजळ होते. पाय वाकवताना किंवा फिरवताना दुखापत झालेल्या भागावर दबाव येतो. या दुखापतीमुळे गुडघ्याच्या हालचालींवरही परिणाम होतो.
डॉक्टर काय सांगतात?
डॉक्टरांच्या मते, या समस्यांमागे मेनिस्कस फाटणे, लिगामेंटला दुखापत होणे, हाडे कमकुवत होणे किंवा अचानक वाढलेला ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास ही मुख्य कारणे असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, या समस्यांची लक्षणे दिसताच लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे योग्य वेळी उपचार करून त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.
मेनिस्कस म्हणजे काय?
मेनिस्कस हा गुडघ्याच्या सांध्यामध्ये असणारा ‘C’ आकाराचा मजबूत मऊ कूर्चेचा भाग असतो. तो मांडीचे हाड आणि पायाच्या खालच्या भागातील हाड यांच्यामध्ये कुशनप्रमाणे काम करतो.
चालताना, धावताना आणि उड्या मारताना गुडघ्यांवर येणारा दबाव कमी करण्याचे काम मेनिस्कस करतो. मेनिस्कस फाटल्यास त्यावरील उपचार हे दुखापतीची तीव्रता, रुग्णाचे वय आणि गुडघ्याची स्थिती यांवर अवलंबून असतात.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
