Dog-faced Bat Cynomops species facts: निसर्गाने एखाद्या वटवाघळाला कुत्र्याचा चेहरा दिला तर? पहिल्या नजरेत भुंकणारा प्राणी वाटेल, पण प्रत्यक्षात तो अंधाऱ्या रात्री हवेत झेपावत कीटकांची शिकार करतो. रुंद नाक, एकमेकांपासून दूर असलेले डोळे आणि लहान, गोलाकार कान असलेला हा सस्तन प्राणी ‘डॉग-फेस्ड बॅट’ म्हणून ओळखला जातो. तो दिसायला श्वानासारखा असला तरी त्यात फरक आहे. त्याला पंख असून तो रात्री कीटकांची शिकार करतो.
मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील जंगलांमध्ये आढळणारे हे वटवाघूळ ‘सायनोमॉप्स’ (Cynomops) या प्रजाती समूहात मोडतो. ग्रीक भाषेत ‘सायनोमॉप्स’ या शब्दाचा थेट संबंध ‘कुत्र्यासारखा दिसणारा चेहरा’ असा येतो. मात्र, शारीरिक साधर्म्य असले तरी या वटवाघळांचा श्वानकुळाशी कोणताही जैविक संबंध नाही.
दीर्घकाळ शास्त्रज्ञांना सायनोमॉप्स समूहातील केवळ सहा प्रजातींची माहिती होती. मात्र, २०१८ मध्ये संशोधकांनी पनामा येथील ‘फ्रीमन डॉग-फेस्ड बॅट’ आणि इक्वाडोरमधील ‘वाओरानी डॉग-फेस्ड बॅट’ अशा दोन नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यामुळे या प्रजातींची संख्या आठवर पोहोचली.
हा शोध केवळ बाह्य रूपावर आधारित नव्हता. संशोधकांनी २४२ नमुन्यांचा अभ्यास करताना त्यांची शारीरिक रचना, डीएनए (DNA) आणि भौगोलिक नोंदींची पडताळणी केली. अनेकदा ज्या वटवाघळांना संग्रहालयात आधीच नोंदवून ठेवले होते, त्यांच्या सखोल तपासणीतून त्या वेगळ्या प्रजाती असल्याचे निष्पन्न झाले.
वेगाे उडण्याची क्षमता आणि ‘इकोलोकेशन’चे तंत्र
डॉग-फेस्ड बॅट आपल्या उडण्याच्या वेगासाठी ओळखले जातात. अरुंद पंखांच्या रचनेमुळे ते जंगलांतील झाडांच्या वरही मोकळ्या हवेत वेगाने उडू शकतात. हाच वेग शास्त्रज्ञांसाठी मोठा अडथळा ठरतो. संशोधकांनी लावलेल्या पारंपरिक जाळ्यांना चकवून हे वटवाघूळ निघून जातात.
यावर मात करण्यासाठी संशोधकांनी ‘इकोलोकेशन’चा आधार घेतला. रात्रीच्या अंधारात संचार करण्यासाठी आणि कीटकांची शिकार करण्यासाठी हे वटवाघूळ उच्च वारंवारतेचे आवाज काढतात. या प्रतिध्वनीवरून ‘बॅट डिटेक्टर्स’च्या साहाय्याने त्यांचे आवाज रेकॉर्ड केले जातात. या आवाजांच्या विश्लेषणातून ‘फ्रीमन डॉग-फेस्ड बॅट’ या स्वतंत्र प्रजातीची निश्चिती करण्यात संशोधकांना यश आले.
नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून या वटवाघळाच्या चेहऱ्याची रचना अशाप्रकारे विकसित झाली आहे, जी मानवी डोळ्यांना कुत्र्यासारखी भासते. हा विस्मयकारक प्राणी निसर्गातील जैवविविधतेचे एक अनोखे उदाहरण मानला जात आहे.
