जाणून घ्या, पाच दिवसांच्या दिवाळी सणाच्या तारखा आणि पूजेचे महत्व

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. पण दिवाळी हा सण पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

lifestyle
दिवाळी हा सदिवाळी हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. (Source: FilePhoto)

दिवाळी हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हिंदू पंचांगानुसार, दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. वर्ष २०२१ मध्ये कार्तिक अमावस्येची तारीख गुरुवार, ०४ नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीजीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी जीची पूजा केल्याने जीवनात कीर्ती आणि वैभव टिकून राहते आणि जीवनात पैशाची कमतरता दूर होते. मात्र दिवाळी हा सण पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तर दिवाळी ही धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू होते, त्यानंतर नरक चतुर्दशी , दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. चला तर मग या वर्षीच्या दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणाच्या तारखा आणि पूजेचे महत्व जाणून घेऊया.

धनत्रयोदशी

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीपासून दीपावलीचा मोठा सण सुरू होतो. या दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशीला संपत्तीची देवता कुबेर, यम आणि औषधाची देवता धन्वंतरी यांची पूजा करण्याचा प्रथा आहे. यंदा धनत्रयोदशीचा सण मंगळवार २ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.

नरकचतुर्दशी व दिवाळी

नरकचतुर्दशीला छोटी दीपावली असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला, म्हणून या दिवसाला नरकचतुर्दशी म्हणतात. तसेच दीपावलीच्या पाच दिवसांच्या सणातील सर्वात महत्त्वाचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दिवाळीत गणेश-लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. यासोबतच हा दिवस लंकेच्या विजयानंतर रामाच्या अयोध्येत परतल्याचा सण म्हणूनही साजरा केला जातो. यंदा दिवाळीचा सण व नरकचतुर्दशी गुरुवार, ०४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.

बलिप्रतिपदा(पाडवा) व गोवर्धन पूजा

सर्वत्र दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा साजरी केली जाते. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. याला अन्नकूटोत्सवही म्हटले जाते. यावर्षी गोवर्धन व बलिप्रतिपदा पूजा ०५ नोव्हेंबर, शुक्रवार रोजी केली जाईल.

भाऊबीज

भाऊबीज किंवा यम द्वितीया हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हा सणही राखीप्रमाणे भाऊ आणि बहिणीला समर्पित आहे. या दिवशी यमुना स्नानाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी भाऊबीज हा सण शनिवार, ०६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Know the dates of the five day festival of diwali scsm

ताज्या बातम्या