Lack of sleep Health Risk: झोपेची कमतरता शरीरावर एक नाही तर अनेक प्रकारे परिणाम करते. झोप कमी झाल्यामुळे व्यक्तीला लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते आणि रोजची कामेही प्रभावित होतात. पण, झोप कमी झाल्यामुळे वजनही वाढू शकते का? कोलंबिया युनिव्हर्सिटी इरविंग मेडिकल सेंटरमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार झोप कमी झाल्यामुळे वजन वाढू शकते. झोपेची कमतरता आणि वजनावर होणाऱ्या परिणामाबद्दल अभ्यासात काय सांगितले आहे, ते जाणून घ्या.

१ आठवडा कमी झोप घेतल्यावर इतके वाढले वजन

अभ्यासानुसार, ज्या लोकांनी ६ आठवडे रात्री गरजेपेक्षा ८० मिनिटे कमी झोप घेतली, त्यांचे वजन वाढले. सरासरी जवळपास अर्धा किलो वजन वाढल्याचे दिसून आले. हे असे लोक होते ज्यांची जीवनशैली फारशी सक्रिय नव्हती.

पूर्ण झोप घेतल्याने आरोग्याला फायदा

कोलंबियाच्या संशोधकांना असे आढळले की, पुरेशी झोप घेतल्यामुळे केवळ वजन वाढण्याचा धोका कमी होत नाही, तर लठ्ठपणाशी संबंधित हृदयरोग आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

भुकेवरही होतो परिणाम

अभ्यासात असे आढळले आहे की, झोप कमी झाल्याचा परिणाम भुकेवरही होतो. व्यक्तीची भूक वाढू शकते आणि ती व्यक्ती जास्त खायला लागते. त्यामुळे वजन वाढू शकते.

अशा प्रकारे करण्यात आला अभ्यास

झोप कमी घेतल्यामुळे होणारे परिणाम तपासण्यासाठी दररोज ७ ते ८ तास झोपणाऱ्या ९५ लोकांवर अभ्यास करण्यात आला. या लोकांना दररोज ९० मिनिटे कमी झोप घेण्यास सांगण्यात आले. झोप आणि हालचालींची पातळी तपासण्यासाठी मनगटावर घालायचे मॉनिटर वापरण्यात आले. तसेच शरीराच्या वजनातील बदल, कमरेचा आकार, शरीरातील चरबी आणि इतर घटक तसेच उपाशीपोटी हार्मोन्सची पातळी तपासण्यात आली.

झोप कमी झाल्याचा आरोग्यावर परिणाम

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या माहितीनुसार, खराब झोपेमुळे मधुमेह, हृदयरोग आणि स्ट्रोकसारख्या आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचाही धोका वाढू शकतो.

किती तास झोप घेणे गरजेचे?

अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार, ६ तासांपेक्षा कमी झोप घेणे म्हणजे झोपेची कमतरता. प्रौढ व्यक्तींनी रात्री किमान ७ तास झोप घेणे गरजेचे आहे. ७ तास किंवा त्यापेक्षा जास्त झोप घेणे पुरेसे मानले जाते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)