Lack Of Sleep And High Blood Pressure : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरापर्यंत मोबाईल वापरणे किंवा काम करणे हा अनेकांच्या रोजच्या रुटीनचा भाग बनला आहे. त्याचा सर्वांत मोठा दुष्परिणाम आपल्या झोपेवर होतो. पाच ते सहा तासांची झोप पुरेशी आहे, असा विचार अनेक जण करतात; पण वास्तव तसं नाही. सातत्यानं होणाऱ्या अपुरी झोपेमुळे हाय ब्लडप्रेशर म्हणजेच हायपरटेंशनचा धोका वाढू शकतो, अशी माहिती इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमेय आमोणकर यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडीओद्वारे दिली आहे.
झोपेदरम्यान शरीरात काय घडते?
डॉ. आमोणकर यांच्या मते, जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपले शरीर ‘रेस्ट मोड’मध्ये जाते. त्या काळात मेंदूचे कार्य मंदावते, हृदयाचे ठोके कमी होतात आणि रक्तवाहिन्या शिथिल (रिलॅक्स) होतात. परिणामी हृदयावरील ताण कमी होऊन, रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
अपुरी झोप बीपीचा धोका कसा वाढवते?
तुम्ही दररोज पुरेशी झोप घेतली नाही, तर शरीर सतत ‘अलर्ट मोड’वर राहते. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन (कॉर्टिसॉल)चे प्रमाण वाढते, हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जास्त राहतात आणि ‘सिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीम’ सतत सक्रिय राहते. त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होऊन हळूहळू हायपरटेंशनचा धोका निर्माण होतो.
६ तासांपेक्षा कमी झोप ठरू शकते घातक
डॉ. आमोणकर यांनी स्पष्ट केले की, जे लोक नियमितपणे सहा तासांपेक्षा कमी झोपतात,त्यांना उच्च रक्तदाबाच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याचा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जर मज्जासंस्थेला (नर्व्हस सिस्टीम) पुरेसा आराम मिळाला नाही, तर केवळ चांगल्या आहाराने हा त्रास पूर्णपणे नियंत्रणात येत नाही. अशा वेळी बीपीच्या औषधांचा प्रभावही मर्यादित राहतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बीपी वाढलेला दिसू शकतो.
उत्तम झोप का महत्त्वाची?
योग्य आणि शांत झोपेमुळे शरीराला पुन्हा ताजेतवाने (रिकव्हर) होण्याची संधी मिळते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य राहतात, रक्तवाहिन्या शिथिल होतात, मानसिक ताण कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो. म्हणूनच हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज रात्री आठ ते नऊ तासांची गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.
