रात्रीच्यावेळी कमी झोपणाऱया कुमारवयीन मुला-मुलींमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. या तरुणांना सर्दी, खोकला, पडसे, फ्ल्यू, पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधनात दिसून आले.
अमेरिकेतील ब्रॅडली हॉस्पिटल स्लीप रिसर्च लॅबोरेटरीच्या कॅथरिन ऑर्झेक यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने कुमारवयीन मुलांची झोप आणि त्यांचे आजार यांचा संबंध असतो का, याची माहिती संशोधनातून घेतली. त्यांनी सर्वात कमी झोप आणि सर्वाधिक झोप यांचा आजार, आजाराचा कालावधी आणि शाळेतील अनुपस्थिती यांचा संबंध या संशोधनातून जोडला. पुरेशी झोप घेतलेल्या कुमारवयीन मुला-मुलींमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते. अशी मुले-मुली शाळेत अनुपस्थित राहण्याचे प्रमाणही कमी असते.
एकूण सहा दिवसांसाठी ऑर्झेक यांनी संशोधनात सहभागी झालेल्या कुमारवयीन मुलांमधील आजार आणि त्यांच्या झोपेच्या वेळा यांचा सविस्तर अभ्यास केला. त्यातून त्यांना आढळले की जर मुले-मुली कमी झोपले, तर ते आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी पुरेशी झोप घेणारी मुले-मुली आजारी पडण्याची शक्यता खूप कमी असते.
ऑर्झेक यांनी गुणात्मक संशोधनावरही भर दिला. त्यासाठी त्यांनी संशोधनात सहभागी झालेल्या मुला-मुलींची वैयक्तिक मुलाखतीही घेतल्या.