प्रत्येक गोष्ट जितकी स्मार्ट पद्धतीने बनू शकते त्या पद्धतीने बनवण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक स्तरावर प्रयोग केले जात आहेत. असाच एक हटके प्रयोग दुबईतील लॅनौर ब्युटी लाऊंजने केला आहे. त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी स्मार्ट मॅनिक्युअर पद्धत विकसित केली आहे. या नवीन प्रयोगाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर कॉन्टॅक्टलेस पेमेंटचे हे भविष्य आहे का? असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो.

नक्की काय आहे हा प्रयोग ?

दुबईतील लॅनौर ब्युटी लाऊंजने ग्राहकांसाठी स्मार्ट मॅनिक्युअर विकसित केले आहे. ब्युटी सलूनने एक अशी मायक्रोचिप विकसित केली आहे जी आपल्या नखांवर बसवली जाऊ शकते. आणि आपल्या नेहमीच्या क्रेडीट, डेबिट कार्ड ऐवजी ही मायक्रोचिप वापरली जाऊ शकते. भविष्यातील कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी अशा मायक्रोचिप वापरल्या जाऊ शकतील.

का बनवली ही मायक्रोचिप ?

दुबईतील लॅनौर ब्युटी लाऊंजच्या संस्थापक असलेल्या नौर मकारेम यांनी कोविड-१९ सारख्या साथीच्या रोगाची सुरूवात झाली तेव्हा या गोष्टीचा विचार केला. त्यांनी सौंदर्य सेवांना आधार देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत ह्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा विचार केला आणि प्रत्यक्षातही आणला. बिल भरण्यासाठी जास्त वेळ लागू नये आणि त्यामुळे ग्राहक एकमेकांच्या जास्त संपर्कात येऊ नयेत हा या मागचा विचार होता. यामुळे सामाजिक अंतर पाळण्यास मदत होऊ शकते असं नौर मकारेम याचं मत आहे.

मायक्रोचिपमध्ये काय काय बसू शकते?

सीएनएन मिडल इस्टसाठी दिलेल्या मुलाखतीत नूर यांनी सांगितले की, सलोन ग्राहकांना या मायक्रोचिपवर हवा तो डेटा अपलोड करून देऊ शकतात. यात डिजिटल बिझिनेस कार्ड, इस्टाग्राम हँडल किंवा व्हॉट्सअ‍ॅपचा डेटाही अपलोड होऊ शकतो. त्याचप्रमाणे ही मायक्रोचिप क्रेडिट कार्ड आणि ऑयस्टर कार्डचा वापर मोबाइल डिव्हाइसला कनेक्ट करण्यासाठी चिप नेयर फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून काम करते. आणि मायक्रोचिप असलेली नखं स्मार्ट फोनवर टॅप झाल्यानंतर काही सेकंदात डेटा हस्तांतरित केला जातो. आपल्या स्मार्टफोनसह मॅनिक्युअर केलेले नखं स्कॅन केल्यावर काही सेकंदातच त्यांची वेबसाइटही उघडली जाते.

नखांवर कशी बसवली जाते ही मायक्रोचिप ?

व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार चमकदार नेल पॉलिशचा थर वापरण्यापूर्वी नखांवर लहान मायक्रोचिप काळजीपूर्वक ठेवलेली दिसते आणि नंतर त्यावरून नेल पॉलिश लावली जाते. सलूनने आतापर्यंत ५०० मायक्रोचिप मॅनिक्युअर पूर्ण केल्याचा दावा केला आहे. स्मार्टफोनवर मायक्रोचिप सक्रिय करण्यासाठी चिप एक ते दोन सेंटीमीटरच्या दरम्यानच ठेवावी लागते.

सध्या ही मायक्रोचिप केवळ थोड्या प्रमाणात माहिती साठवण्यास सक्षम असूनही, भविष्यात कॉन्टॅक्टलेस पेमेंट आणि रेस्टॉरंट मेनूचा समावेश करण्यासाठीही उपयोगात येऊ शकेल अशी आशा नौर यांनी व्यक्त केली.