Male Infertility & Lifestyle: सध्याच्या वर्क फ्रॉम होमच्या काळात किंवा घरातील कामासाठी अनेकजण लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करण्यास प्राधान्य देतात. मात्र, ही सवय पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी घातक ठरू शकते का? लॅपटॉपच्या वापरामुळे खरोखरच पुरूषांवर असे परिणाम होतात का? तर मग तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊयात…
लॅपटॉप मांडीवर ठेवल्याने स्पर्म काउंट कमी होतो का?
तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉप मांडीवर ठेवल्याने थेट वंध्यत्व येणे असे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे बरोबर नसले तरी, या सवयीचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर (Fertility) नकारात्मक परिणाम नक्कीच होतो. यामुळे भविष्यात वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.
नेमका काय परिणाम होतो?
‘वेरीवेल हेल्थ’ (Verywellhealth) च्या अहवालानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करते, तेव्हा त्यातून निघणारी उष्णता (Heat) आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (Electromagnetic Field) शरीराच्या संवेदनशील भागांवर परिणाम करतात. शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने उष्णता आणि रेडिएशन या दोन कारणांवर लक्ष केंद्रित केले आहे.
उष्णतेचा घातक परिणाम
तापमान संतुलन: शुक्राणूंच्या (Sperm) निर्मितीसाठी अंडकोषांचे (Testicles) तापमान शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा थोडे कमी असणे आवश्यक असते. म्हणूनच निसर्गाने अंडकोषांची रचना शरीराच्या बाहेर केली आहे.
तापमानात वाढ: २००५ मधील एका संशोधनानुसार, लॅपटॉप मांडीवर ठेवल्यामुळे अंडकोषांचे तापमान सुमारे २.८ अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकते. या वाढलेल्या उष्णतेमुळे शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो आणि त्यांची गुणवत्ता खालावते.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आणि रेडिएशन
- लॅपटॉप, वाय-फाय आणि मोबाईल यांसारख्या उपकरणांमधून अदृश्य ऊर्जा लहरी (Energy Waves) बाहेर पडतात. काही संशोधनांत असे दिसून आले आहे की,
- वाय-फायच्या संपर्कात आल्याने स्पर्मच्या डीएनएला इजा पोहोचू शकते.
- शुक्राणूंची हालचाल करण्याची गती (Mobility) मंदावते, जी गर्भधारणेसाठी अत्यंत आवश्यक असते.
तज्ज्ञांचा सल्ला
लॅपटॉपचा वापर आणि पुरुष वंध्यत्व यांचा थेट संबंध पूर्णपणे सिद्ध करण्यासाठी अद्याप अधिक संशोधनाची गरज आहे. मात्र, सावधगिरी म्हणून लॅपटॉप नेहमी टेबलवर ठेवूनच वापरावा. तसेच, सैल कपडे घालणे, गरम पाण्याने अंघोळ करणे टाळणे आणि सकस आहार घेणे यांसारखे छोटे बदल प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे लॅपटॉवर काम करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
