How to Remove Sweat Stains : गरम आणि दमट हवामानामुळे कपड्यांवर घामाचे डाग पडणे आणि त्यांची चमक कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा नियमित सुती किंवा मशीन वॉशनेही हे हट्टी डाग आणि दुर्गंधी पूर्णपणे निघत नाही. अशा वेळी महागडे डिटर्जंट्स वापरण्याऐवजी काही सोपे घरगुती उपाय तुमचे कपडे पुन्हा स्वच्छ, ताजे आणि सुगंधी बनवू शकतात.
उन्हाळ्यात घाम येणे नैसर्गिक असले, तरी त्यामुळे कपड्यांवर पडणारे पिवळे डाग फिकट रंगाच्या कपड्यांवर लगेच उठून दिसतात. यामुळे कपडे जुने आणि मळकट वाटू लागतात. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर बाजारातील महागड्या केमिकल प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टी यावर रामबाण उपाय ठरू शकतात.
या घरगुती उपायांमुळे केवळ हट्टी डागच दूर होत नाहीत, तर कपड्यांचा सुवास आणि ताजेपणाही दीर्घकाळ टिकून राहतो. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही प्रभावी घरगुती टिप्स:
१. लिंबाचा रस (नॅच्युरल ब्लीचिंग एजंट)
लिंबू हे नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते. लिंबाचा रस पाण्यात मिसळून डाग पडलेल्या भागावर लावा आणि थोडा वेळ राहू द्या. त्यानंतर कपडे नेहमीप्रमाणे धुवून घ्या, डाग सहज हलके होतील.
२. बेकिंग सोडा पेस्ट
घामाचे जुने आणि हट्टी डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत प्रभावी मानला जातो. बेकिंग सोडामध्ये थोडे पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावून काही वेळ सुकू द्या आणि नंतर कपडे स्वच्छ धुवा.
३. लिक्विड डिटर्जंट आणि कोमट पाणी
जर डाग अगदी नवीन असतील, तर कपडे काही वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्यावर थोडे लिक्विड डिटर्जंट लावून हलक्या हाताने चोळा. डाग झटपट निघून जातील.
४. व्हाईट व्हिनेगर (White Vinegar)
पांढरे व्हिनेगर कपड्यांवरील पिवळे डाग आणि घामाचा उग्र दर्प दोन्ही दूर करण्यासाठी उत्तम मानले जाते. कोमट पाण्यात थोडे व्हिनेगर मिसळून डाग असलेला भाग त्यात काही वेळ भिजवून ठेवा आणि नंतर नेहमीप्रमाणे धुवा.
५. माउथवॉशचा अनोखा वापर
हे ऐकायला थोडे आश्चर्यकारक वाटेल, पण माउथवॉश कपड्यांमधील दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो. पाण्यात थोडे माउथवॉश मिसळा, कपड्याचा दुर्गंधी येणारा भाग त्यात काही वेळ भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
६. वॉशिंग सोडा (कपड्यांना येईल नवी चमक)
सोडियम कार्बोनेट म्हणजेच वॉशिंग सोडा कपड्यांवरील हट्टी डाग सैल करण्याचे काम करतो. वॉशिंग सोड्याची पेस्ट बनवून डागावर लावा आणि धुण्यापूर्वी काही वेळ तशीच राहू द्या. यामुळे कपड्यांना अतिरिक्त चमक मिळते.
७. ॲस्पिरिन (Aspirin) गोळ्या
फार कमी लोकांना माहीत आहे की, डोकेदुखीवर वापरली जाणारी ऍस्पिरिन गोळी घामाचे डाग काढू शकते. कोमट पाण्यात ॲस्पिरिनच्या दोन गोळ्या विरघळवून ते द्रावण डागावर लावा. तुमचे कपडे पूर्वीसारखे चकाकू लागतील.
महत्त्वाची टीप: कोणताही घरगुती उपाय संपूर्ण कपड्यावर वापरण्यापूर्वी, तो कापडाच्या एका लहान आणि न दिसणाऱ्या कोपऱ्यावर तपासून (Patch Test) पहा. यामुळे कपड्याचा रंग किंवा दर्जा खराब होणार नाही याची खात्री पटेल.
