Laundry Detergents Cancer Risk : तुमच्यापैकी अनेकांना असे वाटते की, घर किंवा कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी डिटर्जंट पावडर, क्लीनर पूर्णपणे सुरक्षित असतात, त्यामुळे आपण रोज सर्रासपणे त्याचा वापर करतो. पण, कर्करोग तज्ज्ञांनी इशारा दिला की, या उत्पादनांमध्ये अधिक प्रमाणात केमिकल्स असतात जी हळहळू आरोग्यावर परिणाम करू शकतात, यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्समध्ये अडथळा येऊ शकतो तसेच गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो.
कॅन्सर इम्युनोथेरपी तज्ज्ञ आणि कॅन्सर हीलर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तरंग कृष्णा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात त्यांनी स्पष्ट केले की रोजच्या वापरातील डिटर्जंट पावडर, क्लीनर किंवा लिक्विडच्या वापराने तुमच्या आरोग्यावर काय घातक परिणाम होतात आणि त्यावर सुरक्षित पर्याय कोणते आहेत, याविषयी सांगितले आहे.
डिटर्जंटचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?
डॉ. तरंग कृष्णा यांनी इशारा दिला की, रोजच्या वापरातील डिटर्जंट आणि क्लीनर्स आरोग्यासाठी गंभीर धोके निर्माण करू शकतात, यामुळे कर्करोगाचाही धोका वाढतो. आपण सुरक्षित मानत असलेल्या या उत्पादनांमध्ये प्रत्यक्षात अशी छुपी रसायने असतात, जी शरीरात हळहळू विष म्हणून काम करू लागतात.
हार्मोनल असंतुलन : डिटर्जंट पावडर, लिक्विडमध्ये ताजे सुगंध निर्माण करण्यासाठी अनेकदा थॅलेट्सचा वापर केला जातो. डॉ. कृष्णा स्पष्ट करतात की, ही हानिकारक रसायने कालांतराने हार्मोनल संतुलन बिघडवू शकतात.
श्वसन आणि कर्करोगाचा धोका : काही डिटर्जंटमध्ये फॉर्मल्डिहाइड आणि बेंझिनसारखे घातक पदार्थ असू शकतात. हे पदार्थ श्वसनसंस्थेला त्रास देऊ शकतात, ब्राँकायटिस होऊ शकतो आणि हे कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढवू शकतात.
रासायनिक क्लीनर्सना सुरक्षित पर्याय कोणते आहेत?
डिटर्जंट पावडर आणि क्लीनर्समुळे आरोग्याला होणारे धोके कमी करण्यासाठी डॉ. कृष्णा नैसर्गिक आणि सुरक्षित पर्यायांचा अवलंब करण्याची शिफारस करतात.
हर्बल क्लीनर्सना प्राधान्य द्या : हर्बल क्लीनर्स सर्वात सुरक्षित पर्याय आहे, कारण ते फक्त पाण्याबरोबर वापरता येतात आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला व तुमच्या कुटुंबाला हानिकारक रसायनांच्या संपर्कात येण्यापासून वाचवता.
जागरूकता महत्त्वाची आहे : त्यांनी सल्ला दिला की, ‘तुम्ही घरात आणत असलेल्या वस्तूंबाबत जागरूक रहा आणि तुमच्या सुरक्षेला प्राधान्य द्या.’
