Leg Cramps At Night Causes: रात्री गाढ झोप लागलेली असताना अचानक पायाच्या स्नायूंमध्ये तीव्र कळ येते आणि काही क्षणांतच झोप उडते, असा अनुभव अनेकांना येतो. अनेक जण त्याला पायात गोळा येणं असं म्हणतात. काही वेळा पायाचा मागचा भाग इतका आखडतो की काही सेकंद पाय हलवणेदेखील कठीण होते. ही समस्या काही वेळापुरती असली तरी त्या क्षणी होणारी वेदना आणि अस्वस्थता मात्र चांगलीच त्रासदायक असते.

अनेकांना वाटते की रात्री पायात कळ येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. अनेकदा ती गंभीर नसतेही. मात्र, जर ही समस्या वारंवार होत असेल तर त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता, स्नायूंवर जास्त ताण किंवा काही औषधांचा परिणाम यांसारख्या कारणांमुळेही लेग क्रॅम्प होऊ शकतो.

रात्री पायात कळ म्हणजे नेमकं काय?

NHSनुसार, लेग क्रॅम्प म्हणजे पायांच्या स्नायूंमध्ये अचानक होणारे आकुंचन किंवा तीव्र ताण. यावेळी स्नायू काही काळासाठी आकसतात आणि त्यामुळे अचानक तीव्र वेदना, आखडल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ही कळ साधारणपणे काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत राहू शकते. रात्री झोपताना किंवा शरीर आराम करत असताना ही समस्या जाणवण्याची शक्यता असते. बहुतेक वेळा लेग क्रॅम्प गंभीर समस्या नसतो आणि काही वेळाने आपोआप कमी होतो. मात्र, कळ गेल्यानंतरही संबंधित स्नायूमध्ये काही काळ दुखणे किंवा संवेदनशीलता जाणवू शकते.

पायात कळ आल्यावर लगेच काय कराल?

रात्री अचानक पायात कळ आली तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही सोपे उपाय करून स्नायूंना आराम मिळवून देता येतो.

उभे राहण्याचा प्रयत्न करा- कळ आल्यावर शक्य असल्यास बिछान्यातून उठून सावकाश सरळ उभे राहा. पायावर हलका भार दिल्याने काही लोकांना क्रॅम्प कमी होण्यास मदत होते.

स्नायू स्ट्रेच करा- कळ आलेल्या पायाच्या स्नायूला हळुवारपणे स्ट्रेच करा. जोरात किंवा अचानक ताण देऊ नका.

नियमित स्ट्रेचिंगची सवय लावा- वारंवार कळ येत असल्यास झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरू शकते.

नेमकी कोणत्या कारणांमुळे येते पायात कळ?

पायात कळ येण्यामागे एकच कारण असेल असे नाही. काही सामान्य कारणे अशी आहेत.

१. शरीरात पाण्याची कमतरता

दिवसभर पुरेसे पाणी न पिणे किंवा शरीरातील द्रवपदार्थ कमी होणे यामुळे स्नायूंमध्ये आकडी येण्याची शक्यता वाढू शकते.

२. स्नायूंवर जास्त ताण

जास्त व्यायाम, बराच वेळ उभे राहणे किंवा स्नायूंवर नेहमीपेक्षा जास्त ताण पडल्यामुळे लेग क्रॅम्प होऊ शकतो. उष्ण किंवा दमट हवामानात व्यायाम केल्यास हा त्रास अधिक जाणवू शकतो.

३. वाढते वय

वय वाढल्यानंतरही रात्रीच्या वेळी पायात कळ येण्याचे प्रमाण वाढू शकते.

४. गर्भावस्था

गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात काही महिलांना पायांच्या स्नायूंमध्ये क्रॅम्पचा त्रास जाणवू शकतो.

५. काही औषधांचा परिणाम

काही औषधांमुळेही स्नायूंमध्ये कळ येऊ शकते. उदाहरणार्थ, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरली जाणारी काही स्टॅटिन औषधे किंवा उच्च रक्तदाबासाठीची काही औषधे.

६. मद्यपान आणि काही आजार

अति मद्यपानामुळे लिव्हरशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास त्यासोबत स्नायूंमध्ये क्रॅम्पची समस्या दिसू शकते.

७. कधी कधी कारण स्पष्ट नसते

विशेष म्हणजे काही लोकांना कोणतेही स्पष्ट कारण नसतानाही पायात कळ येऊ शकते.

वारंवार कळ येत असेल तर दुर्लक्ष करू नका

एखाद्या वेळी अचानक पायात कळ येणे ही सामान्य बाब असू शकते. मात्र, हा त्रास वारंवार होत असेल, झोप सतत खराब होत असेल किंवा कळ खूप तीव्र आणि दीर्घकाळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. पायात कळ येते म्हणून स्वतःहून कोणतेही सप्लिमेंट, इलेक्ट्रोलाइट किंवा औषध सुरू करू नका. वारंवार होणाऱ्या त्रासामागे नेमके कारण काय आहे, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणे अधिक योग्य आहे.