Frequent Leg Cramps Reasons: पायात अचानक गोळा येणे, रात्री झोपताना पोटरीचे स्नायू आखडणे किंवा चालताना पायात तीव्र वेदना होणे, असा त्रास अनेकांना जाणवतो. अनेकदा शरीरातील पाण्याची कमतरता, थकवा किंवा दिवसभर उभे राहिल्यामुळे हा त्रास होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे बहुतेक जण याकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, पायात वारंवार गोळे येत असतील, तर त्यामागे रक्ताभिसरणातील अडथळे, नसांचे विकार किंवा शरीरातील पोषक घटकांचे असंतुलन यांसारखी कारणेही असू शकतात.

हृदयविकारतज्ज्ञ आणि हृदय प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पायात वारंवार गोळे येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. त्यांच्या मते, गोळे कधी येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि विश्रांती घेतल्यानंतर कमी होतात का, यावरून शरीरातील काही समस्यांचे संकेत मिळू शकतात. मात्र, प्रत्येक वेळी पायात गोळा येणे हे गंभीर आजाराचे लक्षण असतेच असे नाही. मग कोणत्या वेळी सावध व्हावे? जाणून घेऊया सविस्तर.

पायात वारंवार गोळे येण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

१. पायांतील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा

चालताना पोटरीत वेदना होणे किंवा गोळा आल्यासारखे वाटणे आणि काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्रास कमी होणे, ही पायांतील रक्ताभिसरणाच्या समस्येची लक्षणे असू शकतात. यामागे पेरिफेरल आर्टरी डिसीज (Peripheral Artery Disease) हे कारण असू शकते. या स्थितीत पायांकडे रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या अरुंद होतात किंवा त्यांच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि चालताना वेदना जाणवू शकतात. हा त्रास वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गंभीर अवस्थेत या आजारामुळे पायांच्या ऊतींनाही धोका निर्माण होऊ शकतो.

२. पायांना सूज येणे आणि रात्री गोळे येणे

काही लोकांच्या पायांना दिवसभर काम केल्यानंतर जडपणा जाणवतो. संध्याकाळी घोट्यांजवळ सूज येते किंवा रात्री झोपताना पोटरीत गोळे येतात. यामागे व्हेनस इनसफिशियन्सी (Venous Insufficiency) म्हणजेच शिरांमधून रक्त हृदयाकडे परत जाण्याच्या प्रक्रियेत अडथळा येणे, हे कारण असू शकते. या स्थितीत पायांमध्ये रक्त साचू शकते. पायांवर फुगलेल्या शिरा दिसणे, सूज आणि जडपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मात्र, या लक्षणांमागे इतर कारणेही असू शकतात. त्यामुळे योग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

३. मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडल्यास स्नायूंच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो. मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास काही लोकांना स्नायू आखडणे किंवा गोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. शरीरात पाण्याची कमतरता, जास्त घाम येणे किंवा काही आरोग्यविषयक समस्यांमुळेही इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. मात्र, प्रत्येक वेळी गोळे येण्याचे कारण या पोषक घटकांची कमतरता असेलच असे नाही. त्यामुळे स्वतःहून सप्लिमेंट्स घेण्याऐवजी गरजेनुसार तपासणी करून घ्यावी.

४. नसांशी संबंधित विकार

पायात गोळे येण्यासोबत मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, जळजळ होणे किंवा स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे अशी लक्षणे असतील, तर नसांशी संबंधित विकारांचाही विचार करावा लागतो. काही वेळा नसांवर दबाव येणे किंवा मज्जासंस्थेशी संबंधित आजारांमुळे स्नायू आखडू शकतात. वेदना पाठीपासून पायापर्यंत पसरत असतील किंवा संवेदनांमध्ये बदल जाणवत असतील, तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

५. थायरॉईडचे विकार, अ‍ॅनिमिया आणि व्हिटॅमिन डीची कमतरता

शरीरातील चयापचय प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या काही समस्या स्नायूंच्या कार्यावरही परिणाम करू शकतात. थायरॉईडचे विकार, अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता आणि व्हिटॅमिन डीची कमतरता यांचा काही लोकांमध्ये स्नायूंच्या वेदना किंवा अशक्तपणाशी संबंध असू शकतो. पायात वारंवार गोळे येण्यासोबत थकवा, अशक्तपणा किंवा इतर लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासण्या करून घ्याव्यात.

६. जास्त व्यायाम, अपुरी विश्रांती किंवा औषधांचे दुष्परिणाम

दीर्घकाळ उभे राहणे, अचानक जास्त व्यायाम करणे, स्नायूंना पुरेशी विश्रांती न देणे किंवा झोपेची कमतरता यांमुळेही पायात गोळे येऊ शकतात.
याशिवाय, काही औषधांमुळे स्नायूंमध्ये गोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. नवीन औषध सुरू केल्यानंतर हा त्रास वाढला असेल, तर डॉक्टरांना त्याबद्दल सांगा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध स्वतःहून बंद करू नका.

सामान्य गोळे आणि गंभीर समस्येचे संकेत कसे ओळखाल?

बेंगळुरू वेस्ट क्लिनिक्स आणि एचसीजी हॉस्पिटल्स, बेंगळुरू येथील मेंदू व मणक्यांच्या शस्त्रक्रियाविशेषज्ञ डॉ. जगदीश चट्टनल्ली यांच्या मते, व्यायामानंतर, शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर येणारे अधूनमधून होणारे गोळे काही वेळात कमी होतात. मात्र, गोळे वारंवार येत असतील आणि त्यासोबत सतत वेदना, मुंग्या येणे, बधिरपणा, स्नायूंमध्ये कमजोरी किंवा स्नायूंचा आकार कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. गोळे येण्याची कारणे समजून घेण्यासाठी ते कोणत्या परिस्थितीत येतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

  • चालताना गोळे येणे आणि विश्रांतीनंतर कमी होणे: रक्ताभिसरणातील समस्येची शक्यता.
  • गोळ्यांसोबत मुंग्या किंवा बधिरपणा जाणवणे: नसांशी संबंधित समस्येची शक्यता.
  • पायांना सूज आणि जडपणा जाणवणे: शिरांमधील रक्तप्रवाहाशी संबंधित समस्येची शक्यता.
  • व्यायामानंतर अधूनमधून गोळे येणे: स्नायूंवरील ताण किंवा इतर तात्पुरत्या कारणांची शक्यता.

ही लक्षणे केवळ संभाव्य संकेत आहेत. त्यावरून स्वतःच आजाराचे निदान करू नये.

पायात किती वेळा गोळे आल्यास डॉक्टरांकडे जावे?

पायात गोळे वारंवार येत असतील, आठवड्यातून अनेकदा हा त्रास होत असेल, रात्री झोपमोड होत असेल किंवा अनेक आठवडे समस्या कायम असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

खालील लक्षणे दिसल्यास विशेष काळजी घ्या:

  • पायात सतत किंवा वाढत्या प्रमाणात वेदना होणे.
  • पायात कमजोरी किंवा बधिरपणा जाणवणे.
  • एका पायाला अचानक सूज येणे, लालसरपणा किंवा उष्णता जाणवणे.
  • पायांच्या त्वचेचा रंग बदलणे किंवा जखम बरी न होणे.
  • चालताना वारंवार वेदना होऊन चालणे थांबवावे लागणे.
  • एका पायाला अचानक सूज, वेदना आणि उष्णता जाणवत असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करा. त्यासोबत श्वास लागणे किंवा छातीत दुखणे सुरू झाल्यास तातडीची वैद्यकीय मदत घ्या.

मधुमेह, थायरॉईडचे विकार, मूत्रपिंडांचे आजार किंवा रक्तवाहिन्या व नसांशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी वारंवार येणाऱ्या गोळ्यांकडे विशेष लक्ष द्यावे.

पायात गोळे येत असल्यास कोणत्या तपासण्या केल्या जातात?

डॉक्टर रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय इतिहास, औषधे आणि शारीरिक तपासणी यांच्या आधारे पुढील तपासण्या सुचवू शकतात.

  • रक्ताच्या तपासण्या: इलेक्ट्रोलाइट्स, मूत्रपिंडांचे कार्य, रक्तातील साखर आणि थायरॉईडचे कार्य तपासण्यासाठी.
  • नसांच्या तपासण्या: नसांशी संबंधित विकारांचा संशय असल्यास नर्व्ह कंडक्शन स्टडी किंवा इलेक्ट्रोमायोग्राफी (EMG).
  • डॉप्लर किंवा रक्तवाहिन्यांच्या तपासण्या: पायांमधील रक्तप्रवाहात अडथळा असल्याचा संशय असल्यास.
    प्रत्येक रुग्णाला या सर्व तपासण्यांची गरज असतेच असे नाही. लक्षणे आणि संभाव्य कारणांनुसार डॉक्टर योग्य तपासण्या ठरवतात.

पायात गोळे येण्याकडे दुर्लक्ष करू नका!

पायात अधूनमधून गोळे येणे ही अनेकदा सामान्य समस्या असू शकते. मात्र, हा त्रास वारंवार होत असेल, चालताना वाढत असेल किंवा त्यासोबत सूज, बधिरपणा अथवा स्नायूंमध्ये कमजोरी जाणवत असेल, तर त्यामागील कारण शोधणे महत्त्वाचे आहे.
पुरेसे पाणी पिणे, व्यायामानंतर शरीराला विश्रांती देणे आणि नियमित झोप घेणे यामुळे काही प्रकारच्या गोळ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. पण वारंवार होणाऱ्या त्रासावर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. लक्षणे कधी सुरू होतात आणि त्यासोबत आणखी काय जाणवते, याकडे लक्ष द्या आणि गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्या.