Leg Pain Reason: अनेकदा जास्त चालणे, व्यायाम करणे किंवा कोणतीही दुखापत झालेली नसतानाही पायांमध्ये दुखणे, ताण जाणवणे किंवा अचानक गोळे येणे सुरू होते. काही लोकांना ही समस्या दिवसा जाणवते, तर काहींना रात्री झोपताना पाय दुखणे किंवा स्नायूंमध्ये गोळे येण्याचा त्रास होतो.

अशावेळी केवळ थकवा आहे असे समजून ही समस्या दुर्लक्षित करणे योग्य नाही. पाय दुखण्यामागे स्नायूंची समस्या, नसांशी संबंधित त्रास, सांध्यांच्या समस्या, रक्ताभिसरणातील अडथळे किंवा शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता अशी अनेक कारणे असू शकतात. एमबीबीएस डॉक्टर शालिनी सिंह सालुंके यांनी पाय दुखण्यामागील काही संभाव्य कारणांबाबत माहिती दिली आहे.

रक्ताभिसरण खराब होणे

शरीरातील रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नसल्यामुळेही पायांमध्ये दुखणे किंवा ताण जाणवू शकतो. जर पाय दुखत असतील आणि विश्रांती घेतल्यानंतरही वेदना कमी होत नसतील, तर रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे अशा वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.

रात्री स्नायूंमध्ये गोळे येणे

काही लोकांना रात्री अचानक पायांच्या स्नायूंमध्ये तीव्र गोळे येतात. याला नाईट लेग क्रॅम्प्स असे म्हणतात. यावेळी स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि काही काळ तीव्र वेदना होऊ शकतात. ही समस्या वारंवार होत असेल तर त्यामागील कारण समजून घेणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन D किंवा इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन D किंवा इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असल्यामुळेही पाय दुखू शकतात. शरीरासाठी आवश्यक असलेल्या काही मिनरल्सची कमतरता झाल्यास स्नायूंमध्ये वेदना, ताण किंवा इतर त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सतत पाय दुखत असतील तर शरीरातील पोषक घटकांची पातळी तपासण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेता येतो.

नसांमध्ये रक्ताची गाठ होणे

जर अचानक एका पायात दुखणे, सूज येणे, लालसरपणा किंवा त्या भागात जास्त उष्णता जाणवणे सुरू झाले, तर त्याकडे साधा पाय दुखण्याचा त्रास म्हणून पाहू नये.

ही लक्षणे DVT म्हणजेच डीप व्हेन थ्रोम्बोसिसशी संबंधित असू शकतात. या स्थितीत पायामध्ये रक्ताची गाठ तयार होऊ शकते आणि त्यामुळे वेदना व सूज येऊ शकते. अशी लक्षणे अचानक दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

काही औषधांचा परिणाम

काही वेळा पाय दुखण्यामागे तुम्ही घेत असलेल्या औषधांचाही संबंध असू शकतो. एखादे औषध दीर्घकाळ घेत असल्यास त्याचा काही लोकांवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाय दुखत असल्यास स्वतःहून औषध घेण्याऐवजी डॉक्टरांशी चर्चा करून त्यामागील नेमके कारण जाणून घेणे योग्य आहे.

महत्त्वाची सूचना

पाय दुखण्याची अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे वारंवार किंवा सतत पाय दुखत असतील, अचानक एका पायाला सूज आली असेल किंवा वेदना कमी होत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)