Leg Swelling Reason: अनेक लोक पायांना आलेली सूज अगदी साधी गोष्ट समजतात. त्यांना वाटतं की जास्त चालल्यामुळे, बराच वेळ उभं राहिल्यामुळे किंवा चुकीच्या चपला वापरल्यामुळे पाय सुजतात. हे काही प्रमाणात खरं असलं तरी, जर पायांना वारंवार सूज येत असेल आणि ती बराच काळ कायम राहत असेल, तर ती अजिबात दुर्लक्षित करू नका. कारण ही शरीरात सुरू असलेल्या एखाद्या गंभीर आजाराची सुरुवातीची खूण असू शकते.

पायांना येणाऱ्या सूजेला वैद्यकीय भाषेत एडिमा (Edema) असं म्हणतात. याचा अर्थ शरीराच्या ऊतींमध्ये जास्त प्रमाणात द्रव साचलेला असतो. जेव्हा शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही किंवा काही अवयव नीट काम करत नाहीत, तेव्हा हा द्रव गुरुत्वाकर्षणामुळे खाली म्हणजेच पाय आणि घोट्यांमध्ये साचतो. ही शरीराची तुम्हाला काहीतरी बिनसलं आहे याची सूचना देण्याची एक पद्धत असते.

पायांना सूज येण्यामागचं एक गंभीर कारण म्हणजे हृदयविकार असू शकतो. जेव्हा हृदय पूर्ण ताकदीने शरीरात रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा रक्त शिरांमध्ये साचू लागतं आणि त्यामुळे पायांना सूज येते. जर सूजेसोबत श्वास घेण्यास त्रास, सतत थकवा किंवा छातीत दुखत असेल, तर ही आपत्कालीन परिस्थिती समजून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पायांच्या सूजेचं आणखी एक मोठं कारण म्हणजे किडनीचा आजार. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकण्याचं काम करते. जर किडनी नीट काम करत नसेल, तर शरीरात सोडियम आणि पाण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पाय, घोटे आणि डोळ्याखाली सूज येऊ शकते. जर लघवीच्या सवयींमध्ये काही बदल जाणवत असतील, तर किडनीची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

लिव्हरशी संबंधित समस्या देखील पायांना सूज येण्याचं कारण ठरू शकतात. लिव्हर अल्ब्युमिन नावाचं एक प्रथिन तयार करतं, जे रक्तवाहिन्यांमधील द्रव बाहेर झिरपू देत नाही. पण लिव्हरला सिरोसिस किंवा इतर काही आजार झाल्यास अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे द्रव आसपासच्या ऊतींमध्ये झिरपू लागतो आणि पायांना सूज येते. त्यामुळे ही समस्या हलक्यात घेणं धोकादायक ठरू शकतं.

याशिवाय, शिरांशी संबंधित डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) हा आजारही खूप गंभीर असू शकतो. या आजारात पायाच्या खोल शिरांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. जर अचानक एका पायालाच जास्त सूज, वेदना किंवा लालसरपणा दिसत असेल, तर त्वरित सावध व्हा. कारण ही रक्ताची गाठ तुटून फुफ्फुसांपर्यंत पोहोचली, तर ती जीवघेणी ठरू शकते.

जर पायांच्या सूजेसोबत वेदना, श्वास घेण्यास त्रास, लघवी कमी होणं किंवा फक्त एका पायाला जास्त सूज येणं अशी लक्षणं दिसत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांकडे जा. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्यास ही समस्या नियंत्रणात येऊ शकते आणि भविष्यात होणाऱ्या गंभीर आरोग्याच्या गुंतागुंतींपासूनही बचाव होऊ शकतो.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)