Liquorice Side Effects And Risks: घसा खवखवणे, खोकला किंवा पचनाशी संबंधित त्रास झाला की अनेकांच्या घरात ज्येष्ठमधचा वापर केला जातो. ज्येष्ठ मधचा छोटा तुकडा चघळणे किंवा ज्येष्ठ मधचा काढा-चहा घेणे हा अनेकांचा जुना घरगुती उपाय आहे. त्यामुळे ज्येष्ठमध म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर अशी अनेकांची समजूत असते. मात्र नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक आहे म्हणजे कोणत्याही प्रमाणात आणि कितीही काळ सेवन करता येते, असे नाही. ज्येष्ठमधचे अतिसेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः उच्च रक्तदाब, हृदय किंवा किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी ज्येष्ठमध घेताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

ज्येष्ठमधीत असते ‘ग्लायसीरायझिन’

आयुष चिकित्सक डॉ. राजकुमार यांच्या माहितीनुसार, ज्येष्ठमधामध्ये ग्लायसीरायझिन (Glycyrrhizin) नावाचे सक्रिय संयुग आढळते. ज्येष्ठमधच्या काही परिणामांसाठी हे संयुग जबाबदार मानले जाते. मात्र ज्येष्ठमधीचे सेवन जास्त प्रमाणात किंवा दीर्घकाळ केल्यास शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

शरीरात सोडियम आणि पाणी साचू शकते

ज्येष्ठमधीचे अतिसेवन केल्यास शरीरात सोडियम आणि पाणी साचण्याची शक्यता वाढू शकते. यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी ज्येष्ठमध नियमितपणे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

पोटॅशियम कमी होण्याचाही धोका

जास्त प्रमाणात ज्येष्ठमध खाल्ल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होण्याचा धोका असतो. पोटॅशियम हे शरीरासाठी महत्त्वाचे खनिज आहे. त्याची कमतरता झाल्यास अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंशी संबंधित त्रास जाणवू शकतो. काही व्यक्तींना शरीराच्या किंवा पायांच्या भागात सूज, डोकेदुखी किंवा अस्वस्थपणा जाणवू शकतो.

‘या’ लोकांनी ज्येष्ठमधीचे सेवन करताना विशेष काळजी घ्या

ज्येष्ठमध प्रत्येकासाठी सारखीच योग्य असेल असे नाही. खालील लोकांनी स्वतःच्या मनाने ज्येष्ठमधीचे नियमित किंवा दीर्घकाळ सेवन टाळावे.

  • उच्च रक्तदाब असणारे लोक
  • हृदयाशी संबंधित आजार असणारे
  • किडनीचा आजार असणारे
  • नियमित औषधे घेणारे व्यक्ती
  • दीर्घकाळ ज्येष्ठमधचा वापर करण्याचा विचार करणारे

काही औषधांसोबत ज्येष्ठमधीचा परिणाम वेगळा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नियमित औषधे घेत असाल तर ज्येष्ठमध रोजच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टर किंवा योग्य आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

नैसर्गिक म्हणजे नेहमीच सुरक्षित असे नाही

ज्येष्ठमधीचा वापर खोकला, घशातील खवखव किंवा काही पचनाशी संबंधित त्रासांसाठी घरगुती उपाय म्हणून केला जातो. मात्र फायदा होतो म्हणून ती रोज आणि अमर्याद प्रमाणात घेणे योग्य नाही. एखाद्या नैसर्गिक पदार्थाचाही शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठमधीचा वापर करताना प्रमाण, सेवनाचा कालावधी आणि तुमची आरोग्यस्थिती या तिन्ही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, हृदय किंवा किडनीचा आजार असल्यास अथवा नियमित औषधे सुरू असल्यास ज्येष्ठमधीचा नियमित वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.