Best Protein and Fiber Rich Foods for Healthy Diet You : बरेच लोक शरीराला प्रथिने मिळावेत यासाठी अंडी खातात. अंडी प्रथिनांचा एक चांगला स्रोत असतात. एका अंड्यातून सुमारे ६ ग्रॅम प्रथिने मिळतात, पण तुम्हाला माहित आहे का की त्यात फायबर अजिबात नसते. पण, जर तुम्हाला प्रथिने आणि फायबर दोन्ही समाविष्ट असलेले पदार्थ खायचे आहेत, तर तुम्ही तुमच्या आहारात इतर अनेक पदार्थांचा समावेश करू शकता. डाळी, चणे, ओट्स यांसारखे रोजच्या वापरातील पदार्थ चांगले पर्याय आहेत. त्यातून प्रथिने आणि फायबर मिळतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते. चला, तर अशा पाच पदार्थांबद्दल जाणून घेऊया.

डाळी

डाळी भारतीय स्वयंपाकघरात एक महत्त्वाचा भाग आहेत. तुमच्या रोजच्या आहारात त्यांचा समावेश केल्याने प्रथिने आणि फायबर दोन्ही वाढू शकतात. एक कप शिजवलेल्या डाळीमध्ये अंदाजे प्रथिने १८ ग्रॅम तर फायबर १५ ग्रॅम असतात. म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला प्रथिने आणि फायबर दोन्हीचे सेवन करायचे असेल तर तेव्हा त्यांचा तुमच्या आहारात डाळीचा नक्की समावेश करा. डाळी फक्त भात किंवा पोळीबरोबर खाण्यापुरते मर्यादित ठेवू नका. तर भाज्या, सूप किंवा सॅलडमध्ये घालूनही खा. पण, लक्षात ठेवा की, वेगवेगळ्या डाळींमधील पोषक तत्वांचे प्रमाण वेगळे असते.

हिरवे सोयाबीन (एडामे)

एडामे म्हणजे पूर्णपणे न पिकलेले हिरवे सोयाबीन. यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरलेले राहण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. एक कप शिजवलेल्या एडामेमधून तुम्हाला सुमारे १७ ग्रॅम आणि सुमारे ८ ग्रॅम फायबर मिळतात.

आहारात कसे समाविष्ट कराल?

एडामे उकडून नाश्त्यात खाऊ शकता. तसेच सॅलडमध्ये किंवा भाज्यांमध्ये मिसळूनही त्याचे सेवन करू शकता.

चणे

काळे असोत किंवा पांढरे, त्यांचा आहारात समावेश केल्यास प्रथिने आणि फायबर एकत्र मिळू शकतात. चणे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहण्यासही मदत होते. एक कप शिजवलेल्या चण्यांमध्ये अंदाजे प्रथिने १४-१५ ग्रॅम आणि फायबर १२ ग्रॅम असतात.याचा आहारात समावेश करण्यासाठी, तुम्ही उकडलेल्या चण्यांचे सॅलड बनवू शकता. तुम्ही ते भाज्यांमध्ये मिसळून किंवा चण्याची चाट बनवून खाऊ शकता. जर चण्यांमुळे गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल, तर कमी प्रमाणात घेऊन सुरुवात करा.

क्विनोआ

क्विनोआ हे एक बी आहे जे सहसा धान्याप्रमाणे शिजवून खाल्ले जाते. जर तुम्हाला भाताला पर्याय म्हणून काही खाऊन बघायचे असेल, तर तुम्ही त्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये अंदाजे ८ ग्रॅम प्रथिने आणि ५ ग्रॅम फायबर असतात. तुम्ही भाताप्रमाणे शिजवून भाज्यांसोबत किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता. पण, क्विनोआमध्ये मसूर, चणे आणि एडामे यांच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण कमी असते. याचा विचार आहारातील एक विविधता म्हणून करणे उत्तम राहील.

ओट्स आणि सीड्स

ओट्समधून फायबरबरोबर थोड्या प्रमाणात प्रथिने मिळतात. त्यात चिया सीड्स, जवस किंवा भोपळ्याच्या बिया घातल्याने तुमच्या नाश्त्यातील एकूण प्रथिने आणि फायबरचे प्रमाण वाढू शकते. ओट्स दुधासोबत शिजवा आणि त्यावर थोड्या प्रमाणात बिया मिक्स करा. आवड असल्यास तुम्ही काही सुकामेवा देखील घालू शकता. लक्षात ठेवा की, बिया आणि सुकामेव्यामुळे कॅलरीज वाढतात, म्हणून तुमच्या गरजेनुसार प्रमाण कमी-जास्त करा.

सगळे पदार्थ अंड्यांची जागा घेऊ शकतात का?

याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्सप्रेसने आकाश हेल्थकेअरच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख, आहारतज्ज्ञ गिन्नी कालरा यांच्याशी चर्चा केली. अंड्यांमध्ये सर्व आवश्यक अमिनो ॲसिड असतात, ज्यामुळे प्रथिनांचा एक परिपूर्ण स्रोत बनतो. मसूर, चणे आणि सोयाबीन यांसारख्या वनस्पती-आधारित प्रथिनांचेही स्वतःचे वेगळे फायदे आहेत. संतुलित आहारात विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, बिया आणि इतर पदार्थांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड मिळू शकतात.

त्यामुळे या पदार्थांना अंड्यांचा पूर्ण पर्याय समजू नये, तर अंड्यांच्या जागी खाता येणारे पर्याय म्हणून त्यांचा विचार करावा. तुम्हाला वजन किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर मसूर आणि चण्यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास आणि अन्नातील कर्बोदकांचे पचन हळूहळू होण्यास मदत होते. मात्र, याचा परिणाम तुम्ही किती प्रमाणात खाता आणि तुमचा एकूण आहार कसा आहे, यावरही अवलंबून असतो. जर तुम्हाला किडनीचा आजार असेल किंवा तुमच्या किडनीच्या आरोग्याबद्दल चिंता वाटत असेल, तर स्वतःहून प्रथिनांचे सेवन वाढवण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

तुमच्या रोजच्या आहारात प्रथिने आणि फायबर कसे समाविष्ट करावे?

प्रथिने आणि फायबर वाढवण्यासाठी तुमचा संपूर्ण आहार बदलण्याची गरज नाही. तुम्ही छोट्या सवयींनी सुरुवात करू शकता, जसे की:
१. तुमच्या रोजच्या जेवणात डाळींच्या प्रमाणाकडे आणि विविधतेकडे लक्ष द्या.
२. सॅलडमध्ये किंवा नाश्त्यामध्ये उकडलेले चणे समाविष्ट करा.
३. तुमच्या सकाळच्या ओट्समध्ये काही बिया मिक्स करा.
४. भाताऐवजी अधूनमधून क्विनोआ खाऊन बघा.
५. तुमच्या गरजा आणि आवडीनुसार तुमच्या आहारात विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करा.

लक्षात ठेवा, केवळ प्रथिनांच्या सेवनावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. तुमच्या शरीराला फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांची देखील गरज असते. संतुलित आणि विविध प्रकारचा आहार राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.