पुढच्या वर्षी नोकरदारांसाठी कामच काम; हक्काच्या अनेक सुट्या जाणार

जाणून घ्या २०२० मध्ये किती सुट्ट्या आहेत आणि कशाप्रकारे प्लॅन करता येतील लाँग विकेण्ड

२०२०

दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये चर्चा होऊ लागते ती पुढील वर्षीच्या कॅलेंडरची. पुढील वर्षी किती सुट्ट्या असतील, कोणत्या सुट्ट्या विकेंडला जोडून येणार यावर अनेक प्लॅन ठरतात. यंदाही अशीच काही चर्चा मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअप ग्रुपवर रंगताना दिसत आहे. मात्र पुढील वर्ष म्हणजेच २०२० हे नोकरदारांसाठी कमी सुट्ट्यांचे असणार आहे. पुढील वर्षातील अनेक हक्काच्या सुट्ट्या या विकेण्डला म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी आल्या आहेत. जानेवारी, जून, जुलै, सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये तर एकही अतिरिक्त सुट्टी नाही. एकंदरितच २०२० हे वर्ष नोकरदारांना अनेक सुट्ट्यांना मुकावे लागणारे वर्ष ठरणार आहे. पाहुयात कोणकोणत्या माहिन्यात किती सुट्ट्या आहेत आणि कोणत्या सुट्यांना नोकरदारांना मुकावं लागणार आहे.

कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या

एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच चार अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. त्या खालोखाल मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी तीन सुट्ट्या असणार आहेत. ऑगस्टमध्येही तीन अतिरिक्त सुट्ट्या आहेत पण या सर्व सुट्ट्या शनिवारी आहेत. म्हणजेच पाच दिवस काम करणाऱ्यांसाठी हा फटका आहे. नोव्हेंबरमध्येही तीन सुट्ट्या आहेत मात्र ऑगस्टप्रमाणे यातील एक सुट्टी (लक्ष्मीपूजन) ही शनिवारी आहे. फेब्रुवारी, मार्च, ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. तर डिसेंबरमध्ये केवळ एक अतिरिक्त सुट्टी (नाताळ) असणार आहे. जानेवारी, जून, जुलै, सप्टेंबर महिन्यांमध्ये एकही अतिरिक्त सुट्टी नसणार.

या सुट्ट्या गेल्या…

दरवर्षी आवर्जून मिळणाऱ्या अनेक सुट्ट्या या २०२०मध्ये शनिवारी आणि रविवारी आहेत. अशा सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे…

 • २६ जानेवारी, गणराज्य दिन – रविवार
 • १ ऑगस्ट बकरी ईद – शनिवार
 • १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन – शनिवार
 • २२ ऑगस्ट, गणेश चतुर्थी – शनिवार
 • २५ ऑक्टोबर, दसरा – रविवार
 • १४ नोव्हेंबर, लक्ष्मीपूजन – शनिवार

तर आठवड्याच्या मध्येच असणाऱ्या सुट्ट्या २०२० मध्ये केवळ तीन महिन्यांमध्ये आहेत. यामध्ये १९ फेब्रुवारी (बुधवार) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे), २५ मार्च (बुधवार) गुडीपाडवा आणि ७ मे (गुरुवार) बुद्ध पोर्णिमा या सुट्ट्यांचा समावेश आहे.

२०२० मध्ये आठ सुट्ट्या विकेण्डला जोडून आलेल्या आहेत. पाहुयात अशा सुट्ट्यांची यादी

 • २१ फेब्रुवारी, महाशिवरात्री – शुक्रवार
 • १ मे, महाराष्ट्र दिन – शुक्रवार
 • २४ मे रमजान ईद – सोमवार
 • २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती – शुक्रवार
 • ३० ऑक्टोबर, कोजागिरी पोर्णिमा आणि  ईद-ए-मिलाद – शुक्रवार
 • १६ नोव्हेंबर, भाऊबीज – सोमवार
 • ३० नोव्हेंबर, गुरु नानाक जयंती  – सोमवार
 • २५ डिसेंबर, नाताळ – शुक्रवार

असे करा सुट्ट्यांचे प्लॅनिंग

अनेक हक्काच्या सुट्ट्या शनिवार, रविवारी आल्याने नोकरदारांना फटका बसणार असला तरी वर्षामध्ये अशा काही संधी आहेत जेव्हा विकेण्डला जोडून एक सुट्टी घेतली तर पाच दिवसांची सुट्टी मिळू शकते. जाणून घेऊयात अशाच काही लाँग विकेण्ड्सबद्दल…

सोमावारी सुटी घेतल्यास मिळणारे लाँग विकेण्ड

 • ९ मार्चला होळी आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी नसते मात्र मंगळवारी म्हणजेच १० मार्चला धूलिवंदनाची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी सुट्टी घेतल्यास ७ ते १० असा चार दिवसांचा लाँग विकेण्ड मिळू शकतो.
 • १० एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी आहे तर मंगळवारी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे सोमावारी १३ एप्रिलला सुट्टी घेतल्यास १० ते १४ अशी पाच दिवस सुट्टी मिळू शकते.शुक्रवारी सुट्टी घेतल्यास मिळणारे लाँग विकेण्ड
 • २ एप्रिलला रामनवमीची सुट्टी आहे तर ६ तारखेला महावीर जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे ३ तारखेला शुक्रवारी सुट्टी घेतल्यास २ ते ६ अशी पाच दिवस सुट्टी मिळू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: List of public holidays in maharashtra india in 2020 scsg