Liver Cancer 5 Early And Hidden Symptoms: भारतामध्ये फॅटी लिव्हर, वाढते मद्यपान आणि व्हायरल हेपॅटायटिस (बी व सी) ही यकृतामध्ये दीर्घकालीन सूज निर्माण करणारी प्रमुख कारणे आहेत. चिंतेची बाब म्हणजे हे आजार आता ३५ वर्षांखालील तरुणांमध्येही वाढताना दिसत आहेत. बदलती जीवनशैली, जंक फूड, कमी हालचाल आणि मद्यपान यांमुळे यकृताचे आजार लवकर वयातच सुरू होतात. विशेषतः सतत तणाव, झोपेची कमतरता आणि असंतुलित आहार यांमुळे यकृतावर अतिरिक्त ताण येतो.

यकृतातील सूज सुरुवातीला बहुतांश वेळा लक्षणांशिवाय असते. त्यामुळे रुग्णांना आजाराची जाणीव होत नाही आणि तो हळूहळू फायब्रोसिस, सिरॉसिस आणि पुढे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (यकृताचा कर्करोग)मध्ये रूपांतरित होऊ शकतो. म्हणूनच लक्षणे दिसण्याची वाट न पाहता, नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही वेळा सतत थकवा येणे, भूक कमी होणे, वजन अचानक घटणे, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना किंवा सूज जाणवणे, तसेच त्वचा किंवा डोळे पिवळे होणे (पीलिया) ही लक्षणे दिसू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

भारतासमोरील दुहेरी आव्हानं म्हणजे एकीकडे स्थूलता व मधुमेहामुळे वाढणारा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD), तर दुसरीकडे अजूनही मोठ्या प्रमाणात आढळणारे हेपॅटायटिस बी व सी संसर्ग. हेपॅटायटिस बीसाठी सुरक्षित लस उपलब्ध आहे आणि हेपॅटायटिस सीसाठी प्रभावी औषधेही आहेत. तरीही जागरूकतेचा अभाव आणि तपासणी उशिरा होणे ही मोठी समस्या आहे. त्याशिवाय चुकीच्या आहाराच्या सवयी आणि औषधांचा अनियंत्रित वापर यांमुळे यकृताच्या पेशींना हळूहळू नुकसान होते, जे पुढे गंभीर आजारात रूपांतरित होऊ शकते.

दीर्घकाळ यकृतावर होणारा परिणाम लक्षात घेतला तर, सिरॉसिस झालेल्या रुग्णांमध्ये कर्करोगाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित स्क्रीनिंग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अल्ट्रासाऊंड आणि AFP (Alpha-fetoprotein) टेस्टसारख्या तपासण्या सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोग ओळखण्यासाठी मदत करतात. वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात आणि रुग्णांचे आयुष्य वाढू शकते.

फास्ट फूड, साखरयुक्त पेये आणि अनियमित जीवनशैली ही आजकालच्या तरुणांमध्ये यकृताचे आजार वाढण्याची महत्त्वाची कारणे आहेत. शरीरात चरबी वाढल्यावर ती यकृतामध्येही जमा होऊ लागते आणि त्यातूनच सूज (inflammation) निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रियावअनेक वर्षे शांतपणे चालते आणि शेवटी गंभीर आजारात बदलते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

“अनेक रुग्ण आमच्याकडे तेव्हा येतात जेव्हा आजार प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो. कारण- सुरुवातीला कोणतीही ठोस लक्षणे दिसत नसतात,” असे Moc cancer care and research centre वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉ. क्षितीज जोशी सांगतात. “वेळोवेळी लिव्हर फंक्शन टेस्ट्स, अल्ट्रासाऊंड आणि जोखमीचे घटक नियंत्रणात ठेवले, तर कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.”

प्रतिबंधासाठी काही साधे, पण प्रभावी उपाय:

  1. मद्यपान टाळा किंवा अत्यंत मर्यादित ठेवा.
  2. संतुलित आहार व नियमित व्यायाम करा.
  3. हेपॅटायटिस बीची लस घ्या.
  4. वजन, मधुमेह व लिपिड्स नियंत्रणात ठेवा.
  5. जोखीम असलेल्या व्यक्तींनी (फॅटी लिव्हर, मधुमेह, कौटुंबिक इतिहास) नियमित तपासणी करून घ्यावी.

तरुणांमध्ये वाढणारा यकृताचां कर्करोग हा टाळता येण्याजोगा धोका आहे. जागरूकता, वेळेवर निदान आणि योग्य जीवनशैली यामुळे आपण हे संकट मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.