scorecardresearch

आरोग्य वार्ता : कमी प्रमाणातील मानसिक तणाव आरोग्यासाठी फायदेशीर

कमी प्रमाणातील तणाव हा मेंदूचे कार्य योग्य प्रमाणात चालण्यासाठी फायदेशीर असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.

आरोग्य वार्ता : कमी प्रमाणातील मानसिक तणाव आरोग्यासाठी फायदेशीर
(संग्रहित छायाचित्र) photo source : loksatta file photo

वॉशिंग्टन : कमी किंवा मध्यम प्रमाणातील मानसिक तणाव आरोग्यासाठी चांगला असल्याचे संशोधन अमेरिकी संशोधकांनी केले आहे. कमी प्रमाणातील तणाव हा मेंदूचे कार्य योग्य प्रमाणात चालण्यासाठी फायदेशीर असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.

जॉर्जिया विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘युथ डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट’ने हे संशोधन केले आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, कमी ते मध्यम पातळीच्या मानसिक तणावामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. एखादा दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवणे किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी कसे जायचे याचे दिशानिर्देश आठवणे यांसारखी दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी लोक वापरतात ती अल्पकालीन स्मरणशक्ती असते. ती सुधारण्यास मानसिक तणाव फायदेशीर ठरतो, असे या संशोधकांनी सांगितले. मात्र हा निष्कर्ष केवळ कमी ते मध्यम पातळीच्या तणावावर आधारित आहे. जर तुमची तणावाची पातळी मध्यम पातळीपेक्षा वर गेली तर ते धोकादायक असून त्याचे रूपांतर मानसिक आजारात होऊ शकते, असेही या संशोधकांनी नमूद केले आहे. तणावाचे वाईट परिणाम अगदी स्पष्ट असून ते नवीन नाहीत, असे या संशोधक गटाचे प्रमुख असफ ओश्री यांनी सांगितले.

सतत उच्च पातळीच्या ताणाचा दुष्परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. त्यामुळे आमचे निष्कर्ष हे कमी ते मध्यम पातळीच्या मानसिक ताणावर आधारित आहे. कमी ते मध्यम तणाव पातळी व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नैराश्य आणि असामाजिक वर्तन यांसारखा मानसिक आरोग्य विकार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. मर्यादित तणावामुळे लोकांना भविष्यातील तणावपूर्ण परिस्थितीत कसे तोंड द्यावे हे शिकण्यास मदत होते, असे ओश्री यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 03:27 IST

संबंधित बातम्या