Kidney Disease Warning Signs: आजच्या धावपळीच्या जीवनात पाठदुखी ही जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सामान्य समस्या बनली आहे. ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम करणे, जिममध्ये जड वजन उचलणे किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे या सर्व कारणांमुळे पाठीत वेदना होऊ शकतात, त्यामुळे अनेकजण या वेदनांकडे ‘साधी स्नायूंची समस्या’ म्हणून पाहतात आणि वेदनाशामक औषधे घेऊन दुर्लक्ष करतात. मात्र, यामागे एक गंभीर कारण दडलेले असू शकते… आणि ते म्हणजे मूत्रपिंडाशी संबंधित आजार! तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पाठदुखी ही साधी नसते. काही वेळा ही वेदना शरीर देत असलेला एक महत्त्वाचा इशारा असतो, ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

स्नायूंचा त्रास की मूत्रपिंडाचा? फरक ओळखणे का महत्त्वाचे?

सामान्यतः स्नायूंमध्ये होणारी वेदना शरीराच्या हालचालीनुसार कमी-जास्त होते. तुम्ही वाकलात, उभे राहिलात किंवा चाललात की वेदना बदलते. पण, मूत्रपिंडाशी संबंधित वेदना थोडी वेगळी असते.

ही वेदना बरगड्यांच्या खाली, पाठीच्या एका बाजूला किंवा कधी दोन्ही बाजूंना जाणवू शकते. ती खोलवर जाणवणारी आणि अनेकदा तीव्र स्वरूपाची असते. काही वेळा ही वेदना मांड्यांपर्यंत (जांघांपर्यंत) पसरू शकते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आराम केल्यावरही जर वेदना कमी होत नसेल, तर हा इशारा साधा नसू शकतो. स्नायू दुखत असतील तर सूज, लालसरपणा दिसू शकतो. पण, मूत्रपिंडाच्या समस्येमुळे होणाऱ्या वेदना बाहेरून दिसत नाहीत, यामुळेच त्या अधिक धोकादायक ठरतात.

हे संकेत दिसतायत? लगेच सावध व्हा!

मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील नैसर्गिक फिल्टर आहे. ते रक्त शुद्ध करण्याचे काम करते, पण जेव्हा ते व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरात विषारी द्रव्ये साचू लागतात आणि त्याचा परिणाम थेट लघवीवर दिसतो.

  • लघवी करताना जळजळ होणे
  • लघवीचा रंग गडद होणे
  • लघवीत फेस (फोम) दिसणे;

हे सर्व संकेत मूत्रपिंड व्यवस्थित कार्य करत नसल्याचे असू शकतात.

याशिवाय, सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या भोवती सूज येणे, पाय किंवा घोट्यांमध्ये सूज दिसणे हेही गंभीर संकेत असू शकतात. शरीरात पाणी साठून राहणे हे मूत्रपिंड बिघडल्याचे लक्षण असू शकते, त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

सतत थकवा, मळमळ… कारण काहीतरी वेगळंच?

जर तुम्हाला कोणतेही कारण नसताना सतत थकवा जाणवत असेल, शरीरात कमजोरी वाटत असेल तर तेही मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते.

जेव्हा मूत्रपिंड रक्त नीट शुद्ध करू शकत नाही, तेव्हा शरीरात अशुद्ध द्रव्ये जमा होतात, यामुळे भूक कमी लागते, मळमळ होते, उलटीसारखे वाटते. काही वेळा विनाकारण थंडी वाजणे किंवा ताप येणे यांसारख्या तक्रारीही जाणवू शकतात.

पाठदुखीसोबत ही लक्षणं? मग वेळ दवडू नका!

जर तुम्हाला पाठदुखीसोबतच खालील लक्षणे जाणवत असतील-

  • वारंवार लघवी होणे
  • उलटी किंवा मळमळ
  • ताप
  • सतत अशक्तपणा

तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मूत्रपिंडाचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले तर त्यावर उपचार करणे सोपे असते. पण, दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि जीवावरही बेतू शकते.

शेवटी लक्षात ठेवा…

पाठदुखी ही नेहमीच साधी नसते. कधी कधी ती शरीर देत असलेला ‘अलार्म’ असतो, त्यामुळे कोणतीही वेदना दीर्घकाळ टिकत असेल किंवा त्यासोबत इतर लक्षणे दिसत असतील तर स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा योग्य तपासणी करून घेणे अधिक सुरक्षित आहे.

वेळीच ओळखा… कारण मूत्रपिंडाचे आरोग्य तुमच्या संपूर्ण शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे!

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)