How to Use Gas Cylinder for Longer Days : इराण-ईराक युद्धामुळे भारतातील LPG पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरातही जाणवू लागली आहे. या संघर्षाचा परिणाम जागतिक इंधन बाजारावर दिसत आहे; पश्चिम आशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारतात एलपीजीच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे.

सध्या एलपीजी सिलिंडरची टंचाई सुरू असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नाहीत, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला गॅस कमी मिळाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. यामुळे कुटुंबांचे जेवणाचे वेळापत्रक, गृहिणींचे काम, वृद्ध आणि कामावर जाणाऱ्या लोकांचे जीवन प्रभावित होते. या परिस्थितीत गॅस बचत आवश्यक आहे. गृहिणींनी स्वयंपाकात कुशल नियोजन करून गॅस वाचवावा लागेल. यामुळे खर्च कमी होईल आणि उपलब्ध गॅसचा प्रभावी वापर होईल. येथे गृहिणींसाठी गॅस बचतीसाठी काही सोपे पण प्रभावी मार्ग सुचवले आहेत. यसध्या गृहिणींना गॅस बचतीसाठी खालील उपाय अमलात आणता येऊ शकतात, जे युट्यूबवरील ‘Simply Marathi’ च्या मार्गदर्शनानुसार आहेत

प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर

जास्ती जास्त प्रेशर कुकरचा वापर करा. जास्तीत जास्त भाज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवा. चिकन-मटण, कडधान्य किंवा ज्या भाज्या शिजवण्यास वेळ लागतो अशा भाज्या कुकरमध्येच शिजवा. कुकरचे डब्बे वापरून एकाचवेळी अनेक गोष्टी शिजवू शकता. ज्यामुळे झटपट अन्न शिजेल आणि गॅसची बचत होईल.

पाणी योग्य प्रमाणात वापरा

आवश्यकतेनुसार भाज्यांमध्ये पाणी वापरावे. भाजी शिजवताना पाणी जास्त झाले तर के आटवण्यासाठी जास्त वेळ लागतो ज्यामुळे जास्त गॅस वापरला जातो.

पूर्व तयारी करून ठेवा

कोणतेही अन्न शिजवताना त्यासाठी आवश्यक पूर्व तयारी करून ठेवा. भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरायचे असेल किंवा लसूण सोलून ठेवा. भाज्या निवडून ठेवणे. भाज्यांसाठी लागणारे वाटण तयार करून ठेवणे. फोडणीसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून ठेवावे. जेणेकरून भाजी तयार करायला फार वेळ लागत नाही अन गॅसची बचत होते.

कडधान्य आधीच भिजवा

कडधान्य आधीच भिजवून घ्या मग शिजवा जणेकरून पटकन शिजतात. किंवा जे कडधान्य पटकन शिजत नाही ते थोडे भाजून घ्या आणि मगच शिजवा. डाळ-तांदुळ स्वच्छ धुवून काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा जेणेकरून पटकन शिजेल.

ओले भांडे सुकवून वापरा

कोणतेही भाडे चांगले सुकूवून घ्या मगच गॅसवर ठेवा.अन्यथा ओले भांडे गरम होण्यासाठी जास्त वेळ लागतो, ज्यामुळे गॅस वाया जातो.

फ्रिझमधील पदार्थ अर्धातास आधी बाहेर ठेवा

फ्रोझन फुड, दुग्धजन्य उत्पादने किंवा फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या देखील थेट रेसिपीसाठी वापरू नये. सर्वात आधी अर्धातास त्या बाहेर काढून ठेवा मगच त्याचा वापर करा. फ्रिजमध्ये ठेवून थंड झालेले पदार्थ सामान्य तापनाला यायला वेळ लागणार नाही आणि गॅस जास्त वाया जाणार नाही. स्वयंपाकही झटपट होईल.

भाज्या नेहमी झाकण ठेवून शिजवा

भाज्या नेहमी झाकून शिजवावे असे सांगितले जाते कारण कोणतीही भाजी झाकून ठेवून वाफेवर शिजवल्यास त्या झटपट शिजतात आणि गॅसचीही बचत होते.

स्वयंपाकासाठी योग्य भांड्याचा वापर

स्वंयपाक करताना योग्य त्या आचेनुसार भांड्याचा वापर करा. तुम्ही जर मोठ्या आचेवर छोटे भांडे ठेवले तर गॅस वाया जातो. स्वयपाकाच्या गरजेनुसार आणि शेगडीच्या आचेनुसार भांड्याचा वापर करा.

स्वयंपाकासाठी गॅसच्या आचेची ज्वाला मध्यम ठेवावी

स्वयंपाक करताना नेहमी गॅस मध्यम आचेवर ठेवावा. गॅस मोठ्या आचेवर ठेवल्यास अन्न करपू शकते आणि कमी आचेवर ठेवल्यास अन्न शिजायला वेळ लागतोच पण गॅसही जास्त वाया जातो.

गॅस गळती टाळण्यासाठी नियमित तपासणी करा

पाईप, बर्नर आणि सिलेंडरचे पाईन नियमित तपासा आणि गॅस गळती होत ना याची खात्री करा. गॅस गळती होत असल्यास तातडीने दुरुस्ती करून घ्या. यामुळे गॅसची बचत होईलच पण गॅस गळतीमुळे होणारा अपघातही टाळता येईल. गॅसच्या आचेतून पिवळा रंग येत असेल तर गॅस बर्नर साफ करण्याची वेळ आली आहे हे लक्षात येते. अधून मधून गॅसची देखील सर्व्हिसिंग करून घ्या.