नवी दिल्ली : ‘ल्युकोसाईट टेलोमीटर लेंथ’ (एलटीएल) या ‘बायोमार्कर’चा स्त्रियांतील रक्तशर्करेशी किंवा ‘टाइप २’ मधुमेहाशी संबंध सिद्ध झाला आहे. २०१५ ते २०२० दरम्यान झालेल्या एका अभ्यासानुसार हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

‘बायोमार्कर’ हा निसर्गत: निर्माण होणारा घटक आहे. त्यामुळे रोगाचे निदान करता येते. चिकित्सकांच्या मते ‘एलटीएल’चा स्तर आपल्या जन्माच्या वेळी सर्वाधिक असतो. किशोरावस्थेपर्यंत या ‘एलटीएल’चा स्तर वेगाने खालावतो. त्यानंतर वृद्धापकाळापर्यंत ‘एलटीएल’ घटण्याचा वेग मंदावतो. दिल्लीच्या एका रुग्णालयाद्वारे जारी केलेल्या निवेदनानुसार जुलै २०१५ ते डिसेंबर २०२० पर्यंत उत्तर भारतातील २० ते ६० वयोगटातील स्त्रियांना या अभ्यासासाठी निवडण्यात आले होते. या महिलांचे या रुग्णालयात सहा महिन्यांपासून वास्तव्य होते. यात ७९७ स्त्रियांची निवड करण्यात आली. त्यात ४९२ स्थूलत्व असलेल्या व ३०५ सामान्य वजनाच्या स्त्रिया होत्या. या स्त्रियांना ‘टाइप २’ मधुमेह नव्हता. परंतु त्यांच्यात रक्तशर्करेचा स्तर अधिक होता. या महिलांचे वय, वैद्यकीय अहवाल, रिकाम्या पोटी त्यांच्यातील रक्तशर्करेचा स्तर याचे विश्लेषण केले गेले. या अध्ययनाची रूपरेखा ‘फोर्टिस सी-डॉक हॉस्पिटल अँड अलाइड सायन्सेस’चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा यांनी तयार केली होती. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘बीएमजे ओपन डायबिटीज रिसर्ज अँड केअर जर्नल’ या विज्ञानपत्रिकेच्या ताज्या अंकात नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहेत. यानुसार संशोधकांनी दावा केला आहे, की ‘एलटीएल’ या ‘बायोमार्कर’चा संबंध वाढते वयोमान, त्याच्याशी संबंधित स्थूलत्व, ‘टाइप २’ मधुमेह, हृदयविकार आदी विकारांशी असतो, याची पूर्वकल्पना होती. मात्र, या नव्या अभ्यासातून हे प्रथमच निदर्शनास आले, की ‘टाइप-२’मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या स्त्रियांत ‘एलटीएल’ आणि स्थूलपणाचा संबंध आहे.