Lung Cancer Symptoms: दरवर्षी १ ऑगस्ट रोजी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन (World Lung Cancer Day) साजरा केला जातो. फुफ्फुसाच्या कर्करोगाचं नाव ऐकलं की सर्वप्रथम सिगारेट आणि धूम्रपान आठवतं.
अनेक वर्षांपासून धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं सर्वात मोठं कारण मानलं जात आहे. पण आता भारतात या आजाराचं चित्र बदलत आहे. डॉक्टरांच्या मते, महिला, तरुण आणि ज्यांनी आयुष्यात कधीही सिगारेट ओढली नाही अशा लोकांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रकरणं समोर येत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारतातही डॉक्टर अशा रुग्णांना पाहत आहेत, जे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पारंपरिक उच्च-धोका गटात मोडत नाहीत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, धूम्रपान न करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग का होत आहे? आणि कोणत्या तपासण्यांमुळे हा आजार वेळेत ओळखता येऊ शकतो?
धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग का होतो? (World Lung Cancer Day)
आकाश हेल्थकेअरमधील श्वसन व स्लीप मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि प्रमुख डॉ. अक्षय बुधराजा यांच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या प्रकारात मोठा बदल होत आहे. धूम्रपान न करणाऱ्या महिलांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रकरणं वाढत आहेत. यामागे घरातील वायूप्रदूषण, स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा किंवा इतर जैवइंधनांचा वापर, इतरांच्या सिगारेटच्या धुराचा संपर्क (सेकंड हँड स्मोक) आणि कामाच्या ठिकाणी हानिकारक पदार्थांच्या संपर्कात येणं ही प्रमुख कारणं असू शकतात.
त्यांच्या मते, भारतीय महिलांमध्ये तंबाखूचा वापर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे खराब होत चाललेली हवेची गुणवत्ता आणि घरातील प्रदूषण ही या आजारामागची महत्त्वाची कारणं असू शकतात.
डॉ. बुधराजा सांगतात की, आता केवळ ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि अनेक वर्षं धूम्रपान केलेले रुग्णच रुग्णालयात येत नाहीत. तरुण, महिला आणि कधीही सिगारेट न ओढलेले लोकही फुफ्फुसाच्या कर्करोगाने रुग्णालयात दाखल होत आहेत. हवेचं प्रदूषण, कामाच्या ठिकाणी हानिकारक पदार्थांचा संपर्क आणि आनुवंशिक कारणं यामागे महत्त्वाची भूमिका बजावत असू शकतात.
धूम्रपान अजूनही सर्वात मोठा धोका
धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रकरणं वाढत आहेत, याचा अर्थ सिगारेटमुळे होणारा धोका कमी झाला आहे, असा नाही. डॉ. अक्षय बुधराजा यांच्या मते, धूम्रपान करणाऱ्यांना धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका सुमारे २० पट जास्त असतो. तसेच स्वतः सिगारेट न ओढताही इतरांच्या सिगारेटच्या धुराच्या सतत संपर्कात राहणाऱ्या लोकांनाही हा धोका वाढू शकतो. घरात किंवा कामाच्या ठिकाणी सतत धुराच्या संपर्कात राहणाऱ्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.
याशिवाय, रेडॉन वायू हा देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचा एक महत्त्वाचा धोका मानला जातो. हा वायू घरात असू शकतो आणि सहज लक्षात येत नाही. मात्र, विशेष चाचणीद्वारे घरात रेडॉन वायू आहे की नाही, हे तपासता येऊ शकतं.
हवेचं प्रदूषणही वाढवत आहे धोका
फक्त बाहेरील नव्हे तर घरातील खराब हवाही फुफ्फुसांसाठी घातक ठरू शकते. स्वयंपाक करताना लाकूड, कोळसा किंवा इतर जैवइंधनांमधून निघणारा धूर आणि घरात योग्य वायुवीजन नसल्यास त्याचा फुफ्फुसांवर दीर्घकाळ वाईट परिणाम होऊ शकतो.
काही लोकांना कामाच्या ठिकाणी धूळ, धूर, रसायनं आणि इतर हानिकारक पदार्थांच्या संपर्कात राहावं लागतं. याला व्यावसायिक संपर्क (Occupational Exposure) असं म्हटलं जातं. डॉक्टरांच्या मते, हेही फुफ्फुसाच्या कर्करोगाचं एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. याशिवाय, काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळेही हा आजार होण्याचा धोका वाढतो.
७० ते ८० टक्के रुग्ण उशिरा पोहोचतात रुग्णालयात
भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांमधील सर्वात मोठी अडचण म्हणजे हा आजार उशिरा निदान होणं. दिल्लीतील ॲक्शन कॅन्सर हॉस्पिटलमधील ॲक्शन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी अँड इम्युनोथेरपीचे संचालक डॉ. जे.बी. शर्मा यांच्या मते, सुमारे ७० ते ८० टक्के रुग्ण रुग्णालयात तेव्हाच पोहोचतात, जेव्हा कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचलेला असतो.
याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित करणं. सतत खोकला येणं, छातीत त्रास होणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं, ही लक्षणं अनेकजण सामान्य संसर्ग किंवा प्रदूषणामुळे झाली असतील असं समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे योग्य तपासणी आणि उपचार सुरू होण्यास उशीर होतो.
कोणत्या तपासण्या कराव्यात?
तज्ज्ञांच्या मते, लो-डोस सीटी (LDCT) स्कॅन आणि मॉलिक्युलर बायोमार्कर टेस्ट या तपासण्यांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग लवकर ओळखण्यास मदत होते. काही प्रकरणांमध्ये या तपासण्यांमुळे कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरण्यापूर्वीच निदान होऊ शकतं.
मात्र, प्रत्येकाने स्वतःहून एलडीसीटी स्कॅन करून घेण्याची गरज नसते. व्यक्तीचं वय, धूम्रपानाचा इतिहास आणि इतर जोखीम घटक लक्षात घेऊन डॉक्टर ठरवतात की कोणाला ही तपासणी आवश्यक आहे.
जर दीर्घकाळ खोकला राहत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत सतत वेदना होत असतील, तर ते केवळ प्रदूषण किंवा सामान्य संसर्ग आहे असं समजून दुर्लक्ष करू नये.
जेनेटिक तपासणीमुळे उपचार कसे ठरतात?
बंगळुरूमधील स्पर्श हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. पलानीअप्पन रामनाथन यांच्या मते, आता फुफ्फुसाच्या कर्करोगाचा उपचार प्रत्येक रुग्णासाठी सारखा राहत नाही. रुग्णाच्या कर्करोगाचं स्वरूप समजून त्यानुसार उपचार ठरवले जातात.
जीनोमिक प्रोफाइलिंगच्या मदतीने EGFR, ALK आणि ROS1 यांसारख्या जनुकीय बदलांची (म्युटेशन) माहिती मिळते. हे बदल आढळल्यास काही रुग्णांना लक्ष्यित औषधोपचार (Targeted Oral Therapy) दिले जाऊ शकतात.
तसेच, प्रगत टप्प्यातील रुग्णांसाठी इम्युनोथेरपीही प्रभावी उपचारपद्धती ठरत आहे. यात शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या मदतीने कर्करोगाच्या पेशींशी लढण्याचा प्रयत्न केला जातो.
कर्करोगाची भीतीही उपचारात उशीर करत आहे
तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या स्तरातील (टियर-२) शहरांमध्ये केवळ जागरूकतेचा अभावच नाही, तर कर्करोगाबद्दलची भीतीही मोठी समस्या आहे. अनेक रुग्णांना फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे निश्चित मृत्यू असं वाटतं आणि त्यामुळे ते वेळेत डॉक्टरांकडे जात नाहीत.
मात्र, आता व्हिडिओ-असिस्टेड थोरॅकोस्कोपिक सर्जरी (VATS) आणि रोबोटिक सर्जरीसारख्या आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. तसेच प्रादेशिक रुग्णालयांमध्येही कर्करोगावरील उपचारांच्या सुविधा वाढत असल्यामुळे रुग्णांना त्यांच्या शहराजवळच चांगले उपचार मिळू शकतात.
फुफ्फुसाचा कर्करोग शरीराच्या इतर अवयवांपर्यंतही पसरू शकतो
प्रगत अवस्थेत फुफ्फुसाचा कर्करोग केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित राहत नाही. तो शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरू शकतो. ॲड्रिनल ग्रंथी या अशा अवयवांपैकी एक आहेत, जिथे हा कर्करोग पोहोचू शकतो. आजार अधिक वाढल्यास मूत्रपिंडांवरही (किडनी) परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत विविध तज्ज्ञ डॉक्टर एकत्र येऊन रुग्णाच्या उपचारांची योजना आखतात.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
