Lung Cancer Warning Signs: फुफ्फुसांचा कॅन्सर हा अत्यंत गंभीर आजार असून, सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणे अगदी सामान्य आजारांसारखी वाटू शकतात. त्यामुळे सतत होणारा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा वारंवार होणारे फुफ्फुसांचे इन्फेक्शन याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. काही लोकांना वारंवार खोकल्याचा त्रास होत असतो, अशावेळी गीर्धकाळ खोकला येत असेल तर दुर्लक्ष करू नका.
फुफ्फुसांमध्ये कॅन्सरच्या पेशी तयार होऊन त्यांची वाढ होत राहिल्यास ट्यूमर तयार होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये या पेशी फुफ्फुसांमधून शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतात. धूम्रपान हे फुफ्फुसांच्या कॅन्सरसाठी महत्त्वाचे जोखमीचे कारण मानले जाते. मात्र, केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच हा कॅन्सर होतो असे नाही. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार, फुफ्फुसांशी संबंधित काही बदलांकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
फुफ्फुसांच्या कॅन्सरची कोणती लक्षणे दिसू शकतात?
१. अनेक आठवडे टिकणारा खोकला- खोकला काही आठवड्यांपर्यंत कायम राहतो आणि दिवसेंदिवस वाढत जातो, तर त्यामागचे कारण तपासणे गरजेचे आहे.
२. खोकल्यातून रक्त येणे- खोकताना थुंकीत किंवा कफात रक्त दिसणे हे दुर्लक्षित करू नये. अशा वेळी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
३. श्वास घेण्यास त्रास- थोडे चालल्यानंतर किंवा नेहमीची कामे करतानाही दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास घेताना वेगळा आवाज येणे याकडे लक्ष द्या.
४. छातीत किंवा हाडांमध्ये वेदना- सतत छातीत दुखणे किंवा काही प्रकरणांमध्ये हाडांमध्ये वेदना जाणवणे हेही तपासणीचे कारण ठरू शकते.
५. आवाजात बदल- आवाज अचानक बसणे किंवा आवाजात दीर्घकाळ बदल जाणवणे हेही फुफ्फुसांशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.
६. भूक कमी होणे- कोणतेही स्पष्ट कारण नसताना भूक कमी होणे किंवा वजन कमी होणे याकडेही दुर्लक्ष करू नये.
७. सतत डोकेदुखी- वारंवार किंवा सतत डोकेदुखी होत असल्यास, विशेषतः इतर लक्षणांसोबत ती दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
८. रक्ताच्या गुठळ्या होणे- काही कॅन्सरच्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो. अचानक पाय सुजणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे आल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
९. वारंवार फुफ्फुसांचे इन्फेक्शन- ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियासारखे फुफ्फुसांचे इन्फेक्शन वारंवार होत असल्यास त्यामागचे कारण डॉक्टरांकडून तपासून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक खोकला म्हणजे कॅन्सर नाही
वरीलपैकी एखादे लक्षण दिसले म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर आहे, असा अर्थ होत नाही. खोकला, दम लागणे, आवाजात बदल किंवा छातीत दुखणे यामागे इतर अनेक सामान्य कारणेही असू शकतात. मात्र, लक्षणे सतत राहत असतील, वाढत असतील किंवा वारंवार होत असतील तर स्वतःहून औषध घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. गरजेनुसार डॉक्टर छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी किंवा इतर तपासण्या सुचवू शकतात.
फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार कसे केले जातात?
फुफ्फुसांच्या कॅन्सरचा उपचार कॅन्सरचा प्रकार, त्याचा टप्पा, तो किती पसरला आहे आणि रुग्णाची एकूण प्रकृती यावर अवलंबून असतो.
सर्जरी : कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असून तो मर्यादित असल्यास शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर किंवा फुफ्फुसाचा प्रभावित भाग काढण्याचा पर्याय असू शकतो.
कीमोथेरपी : कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी किंवा त्या नष्ट करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. ही औषधे शरीरभर काम करू शकतात.
रेडिएशन थेरपी : उच्च-ऊर्जेच्या किरणांचा वापर करून कॅन्सरच्या पेशींवर उपचार केले जातात. ट्यूमरचा आकार कमी करण्यासाठी किंवा कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी ही पद्धत वापरली जाऊ शकते.
टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी : काही रुग्णांमध्ये कॅन्सरच्या पेशींमधील विशिष्ट बदल लक्षात घेऊन टार्गेटेड औषधे दिली जातात. इम्युनोथेरपीमध्ये शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला कॅन्सरच्या पेशींविरुद्ध काम करण्यास मदत केली जाते.
फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये वेळीच निदान होणे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे अनेक आठवडे टिकणारा किंवा वाढत जाणारा खोकला, खोकल्यातून रक्त येणे, सतत दम लागणे, छातीत दुखणे किंवा वारंवार फुफ्फुसांचे इन्फेक्शन यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
