Lung Cancer Symptoms: फुफ्फुसांचा कॅन्सर हा सर्वात गंभीर कॅन्सरपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, २०२२ मध्ये जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे सर्वाधिक मृत्यू झाले होते. अशा परिस्थितीत, या धोकादायक आजाराचे वेळीच निदान होणे आणि उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे.

फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यास त्याची धोक्याची चिन्हे आणि सुरुवातीची लक्षणे खूप सौम्य असू शकतात. मात्र, ही लक्षणे दिसू लागल्यानंतर २ ते ३ आठवडे होऊनही बरी होत नसतील, तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे कोणती असतात, ते जाणून घेऊया.

फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे कशी दिसतात?

छातीत सतत दुखणे हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे एक प्रमुख लक्षण आहे. मात्र, याशिवाय आणखी ६ त्रासही फुफ्फुसांच्या कॅन्सरमुळे होऊ शकतात.

  • सतत खोकला येणे आणि तो लवकर बरा न होणे.
  • वारंवार धाप लागणे आणि खोल श्वास घेण्यास त्रास होणे.
  • शरीरात सतत थकवा जाणवणे.
  • कोणताही प्रयत्न न करता किंवा व्यायाम न करताही वजन कमी होऊ लागणे.
  • खोकताना तोंडातून रक्त येणे.
  • फुफ्फुसांचे संसर्ग वारंवार होणे.

ही लक्षणे दिसू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. सामान्य त्रास समजून ती टाळण्याऐवजी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोणत्या लोकांनी कॅन्सरची तपासणी करून घ्यावी?

नियमित तपासणी आणि संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घेतल्यास फुफ्फुसांच्या कॅन्सरचे लवकर निदान होऊ शकते. विशेषतः जे लोक जास्त प्रमाणात धूम्रपान करतात, त्यांनी वेळोवेळी कॅन्सरची तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील तपासण्याही करून घ्याव्यात.

फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान कसे केले जाते?

फुफ्फुसांच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी (Lung Cancer Test) डॉक्टर सर्वप्रथम रुग्णाची शारीरिक तपासणी करतात. याशिवाय, एक्स-रे आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी (CT Scan) यांसारख्या इमेजिंग चाचण्या केल्या जातात.

फुफ्फुसांच्या आतील भागाची तपासणी करण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी केली जाऊ शकते. याशिवाय, फुफ्फुसांच्या ऊतींचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाते. मॉलिक्युलर टेस्टिंगच्या मदतीनेही कॅन्सरचे निदान केले जाऊ शकते.

कोणत्या लोकांना फुफ्फुसांच्या कॅन्सरचा जास्त धोका असतो?

सिगारेट, सिगार, बिडी किंवा पाइप ओढणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय, इतरांच्या धूम्रपानामुळे होणाऱ्या धुराच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही (Secondhand Smoke) हा धोका असतो.

सतत बाहेरील प्रदूषणाच्या संपर्कात येणे, सिलिका, ॲस्बेस्टॉस आणि डिझेलच्या धुराच्या संपर्कात राहून काम करणे, रेडॉन वायूच्या संपर्कात येणे, फुफ्फुसांचे काही आजार आणि आनुवंशिक कारणांमुळेही फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो.

फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार कसे केले जातात?

फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार करताना कॅन्सरची अवस्था, त्याचा प्रकार, मॉलिक्युलर प्रोफाइल आणि रुग्णाच्या एकूण आरोग्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर रुग्णासाठी योग्य उपचारपद्धती निवडली जाते.

कॅन्सरच्या उपचारांसाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत.

  • शस्त्रक्रिया (Surgery)
  • रेडिओथेरपी किंवा रेडिएशन थेरपी (Radiotherapy)
  • केमोथेरपी (Chemotherapy)
  • टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy)
  • इम्युनोथेरपी (Immunotherapy)

कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढून टाकला जातो. कॅन्सरचा ट्यूमर वाढू नये किंवा त्याचा आकार कमी व्हावा यासाठी निओॲडजुव्हंट थेरपी (Neoadjuvant Therapy) दिली जाऊ शकते.

जर शस्त्रक्रिया करणे शक्य नसेल, तर रेडिएशन थेरपी हा प्राथमिक उपचाराचा पर्याय म्हणून निवडला जाऊ शकतो. याशिवाय, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचाही वापर केला जाऊ शकतो.

उपचारांनंतर रुग्णाची नियमित तपासणी केली जाते. डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतात आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचार सुरू ठेवतात. कॅन्सरची अवस्था अधिक गंभीर किंवा प्रगत झाल्यास उपचारपद्धतीमध्ये बदल केले जाऊ शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)