Lung function test at home: जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. जेव्हा शरीराच्या सर्व भागांना नियमितपणे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा केला जातो तेव्हाच संपूर्ण शरीर योग्यरित्या कार्य करू शकते. हृदय आणि फुफ्फुसे हे एकत्रितपणे कार्य करतात. मात्र, जर त्यापैकी एकही अपयशी ठरले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. फुप्फुसांचा आजार ही एक वेदनादायक स्थिती आहे. कोणत्याही वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. आजही जगभरात दरवर्षी लाखो लोक फुप्फुसांच्या आजारांमुळे आपला जीव गमावतात. दिल्लीतील मूलचंद हॉस्पिटलमधील फुप्फुस विभागाचे डॉ. भगवान मंत्री यांच्याकडून जाणून घेऊया की तुमचे फुप्फुस कसे निरोगी ठेवावे.

फुप्फुसांमध्ये कोणता आजार होतो?

फुप्फुसतज्ज्ञ डॉ. भगवान मंत्री यांनी जनसत्ताशी बोलताना सांगितले की, फुप्फुसांच्या प्रमुख आजारांमध्ये क्षयरोग, दमा, सीओपीडी, न्यूमोनिया आणि फुप्फुसांचा कर्करोग यांचा समावेश आहे, जे वायू प्रदूषण, धूम्रपान आणि हवामान बदल यांसारख्या घटकांमुळे होतात. म्हणूनच तुमचे फुप्फुस निरोगी आहेत की नाही हे निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फुप्फुसांची तपासणी कशी करावी?

डॉ. भगवान मंत्री यांच्या मते, फुप्फुसांच्या कार्य चाचण्या घरी केल्या जाऊ शकतात. हे करण्याचे काही सोपे मार्ग आहेत, जे तुम्हाला तुमच्या फुप्फुसांच्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यास मदत करू शकतात.

श्वास रोखण्याचा व्यायाम

डॉ. भगवान मंत्री म्हणतात, “तुमच्या फुप्फुसांची तपासणी करण्यासाठी श्वास घेण्याचे व्यायाम केले जाऊ शकतात. यामध्ये तुमचा श्वास तोंडात रोखून ठेवणे समाविष्ट आहे. हा व्यायाम किमान सहा महिने करा. जर तुम्ही श्वास घेण्याच्या व्यायामादरम्यान २५ ते ३० सेकंद श्वास रोखून ठेवू शकलात, तर तुमचे फुप्फुस निरोगी असतात.”

पीक रेस्पिरेटरी फ्लो मीटर

फुप्फुसांची क्षमता तपासण्यासाठी PEFR चाचणीदेखील एक चांगला पर्याय आहे. त्याचा हिरवा, पिवळा आणि लाल असे तीन रंग आहेत. हे तीन रंग तुमच्या फुपफुसांची सध्याची स्थिती निश्चित करण्यात मदत करू शकतात. जर मीटर फुंकल्यानंतर हिरवा रंग आला तर तुमचे फुप्फुस चांगल्या स्थितीत आहेत. जर त्याचा पिवळा रंग आला तर काही सुधारणा आवश्यक आहे आणि लाल रंग खराब स्थिती दर्शवितो. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टर फुप्फुसांची तपासणी कशी करतात?

डॉ. भगवान यांच्या मते, फुप्फुसांच्या तपासणीमध्ये एक्स-रे, सीटी स्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी, फुप्फुस बायोप्सी आणि पॉलीसोम्नोग्राफी यांचा समावेश आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, अलीकडच्या वर्षांत फुप्फुसांचा कर्करोग होण्याचा उच्च धोका असलेल्या लोकांमध्ये कमी डोस कॅट स्कॅन किंवा सीटी स्कॅन (एलडीसीटी) म्हणून ओळखली जाणारी चाचणी केली जात आहे. एलडीसीटी स्कॅन फुप्फुसातील असामान्य भाग शोधण्यात मदत करू शकतात, जिथे कर्करोग असू शकतो.

फुप्फुसांच्या नुकसानाची लक्षणे

  • छातीत सतत दुखणे
  • एक महिना किंवा त्याहून अधिक काळ खोकला येणे
  • श्वास घेण्यात अडचण
  • खोकताना रक्त येणे
  • अचानक वजन कमी होणे

तुमचे फप्फुस कसे निरोगी ठेवावेत

तुमचे फुप्फुस निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजार टाळण्यासाठी धूम्रपान टाळा, घरातील आणि बाहेरील प्रदूषण टाळा, योगा आणि व्यायाम करा, व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खा आणि फुप्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.