Lung Detox Drink : पावसाळ्यानंतर आता हळूहळू थंडी वाढू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये अचानक झालेल्या पावसामुळे हवामान जास्त थंड झाले आहे; तर दिवसा कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. अशा वातावरणात खोकला आणि घशाची खवखव होणे साहजिक आहे. अशा वेळी वारंवार औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात. हे उपाय अँटीबायोटिक्ससारखेच काम करतात. असेच एक शरीराला उष्णता देऊन, फुप्फुसांचे डिटॅाक्स करू शकणारे आरोग्यासाठी उत्तम असे एक हर्बल ड्रिंक आहे.
प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी या चहा किंवा ड्रिंकची रेसिपी सांगितली आहे. फुप्फुसे डिटॅाक्स करण्यासाठी हे ड्रिंक खूप मदत करते. थंडीच्या दिवसांमध्ये जर तुमच्या शरीराला हलकीशी उष्णता हवी असेल, तर तुम्ही हा काढा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. या काढ्याचे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजपणे उपलब्ध असते. चला तर मग, ही ड्रिंक बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
बदलता ऋतू आणि आरोग्याची काळजी
ऋतू बदलत असताना आरोग्याची थोडी जास्त प्रमाणात काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळा सुरू होताच हवेत प्रदूषणही वाढू लागते, ज्यामुळे श्वसनसंस्थेवर (Respiratory System) वाईट परिणाम होतो. या दिवसांत काही साधी पथ्ये पाळल्यास तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. जसे की, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे आणि इम्युनिटी बूस्टर ड्रिंक्सचा आहारात समावेश करणे, ज्यामुळे फुप्फुसांचे आरोग्यही उत्तम राहते.
लागणारे साहित्य:
- २०० मिलिग्रॅम पाणी
- २ ते ३ लवंगा
- लसणाची १ पाकळी
- पाव चमचा सुंठ पावडर किंवा आले
- अर्धे ताजे लिंबू
कसे बनवायचे हे ड्रिंक?
सर्वप्रथम पाणी चांगले उकळून घ्या आणि गॅस बंद करा. त्यानंतर त्यात लवंग, लसणाची पाकळी, सुंठ पावडर किंवा ठेचलेले आले टाका. हे मिश्रण काही वेळ झाकून ठेवा, जेणेकरून वापरण्यात येणाऱ्या सर्व पदार्थांच गुणधर्म पाण्यात उतरतील. जेव्हा हे ड्रिंक कोमट किंवा थोडे जास्त गरम असेल, तेव्हा ते गाळून घ्या. मग त्यात लिंबाचा रस मिसळा आणि घोट घोट करून प्या.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या :
बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
आहार संतुलित ठेवा, घरचे ताजे अन्न खा आणि जंक फूड, प्रोसेस्ड फूड व जड अन्नापासून दूर राहा.
आहारात व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे, भाज्या, सुका मेवा, नट्स आणि बियांचा समावेश करा, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) मजबूत राहील.
हवामानानुसार कपडे घाला. सकाळी व संध्याकाळी थंडी आणि दुपारी ऊन असते, त्यामुळे एकावर एक कपडे घालण्याची (लेयरिंग कपडे) पद्धत सर्वोत्तम ठरते.
लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. कारण- त्यांची रोगप्रतिकारशक्ती थोडी कमकुवत असते.
जर दोन-तीन दिवस सलग खोकला, सर्दी आणि तापाची लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थंडी आणि प्रदूषणयुक्त धुके जास्त प्रमाणात असेल, तर सकाळी व संध्याकाळी बाहेर पडणे टाळा किंवा बाहेर पडताना आवर्जून मास्क वापरा.
