Dr Shriram Nene Constipation Tips: पोट व्यवस्थित साफ न होणे, शौचाला त्रास होणे किंवा वारंवार पोट फुगल्यासारखे वाटणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. यालाच बद्धकोष्ठता म्हणजेच Constipation म्हणतात. अनेकदा आहारातील चुकीच्या सवयी, शरीरात पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हा त्रास वाढू शकतो. अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती आणि डॉ. श्रीराम नेने यांनी बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या उपायांवर प्रकाश टाकला आहे. बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलेले ४ उपाय…
१. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण वाढवणे महत्त्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या, दुधी भोपळा, कोबी यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करा. याशिवाय फळे, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांमधूनही शरीराला फायबर मिळते. फायबरमुळे मल मऊ होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते.
२. दिवसभर पुरेसे पाणी प्या
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मल कडक होऊ शकतो. त्यामुळे शौचास साफ होण्यास त्रास होतो. पुरेसे पाणी प्यायल्याने मल मऊ राहण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याची सवय लावा.
३. दररोज व्यायाम करा
शारीरिक हालचालींचा अभाव हेदेखील बद्धकोष्ठतेमागील एक कारण असू शकते. नियमित व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत होते. यासाठी दररोज चालणे, हलका व्यायाम किंवा योगासने करू शकता. सुरुवातीला २० ते ३० मिनिटे चालण्याची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते.
४. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा
निरोगी पचनसंस्थेसाठी केवळ आहारच नाही, तर नियमित दिनचर्यादेखील महत्त्वाची आहे. दररोज ठराविक वेळी झोपणे आणि सकाळी ठरलेल्या वेळी उठणे याची सवय लावा. शरीराची दिनचर्या नियमित ठेवल्याने शौचाची वेळही नियमित होण्यास मदत होऊ शकते.
बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष करू नका
कधीतरी बद्धकोष्ठतेचा त्रास होणे सामान्य असू शकते. मात्र, वारंवार पोट साफ होत नसेल, शौचाच्या वेळी वेदना होत असतील किंवा पोट फुगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आहार आणि दिनचर्येत बदल करूनही आराम मिळत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मलातून रक्त जाणे, तीव्र पोटदुखी, उलट्या किंवा अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. फायबरचे प्रमाण अचानक वाढवण्याऐवजी हळूहळू वाढवा आणि त्यासोबत पुरेसे पाणी प्या. प्रत्येक व्यक्तीची पचनसंस्था वेगळी असल्याने उपायांचा परिणामही वेगवेगळा असू शकतो.
