Best Cooking Oils for Heart Health: हृदयाचे आरोग्य ही केवळ वयस्करांची नव्हे, तर आजच्या तरुण पिढीचीही मोठी चिंता झाली आहे. वाढता ताणतणाव, बदललेली जीवनशैली, जंक फूडची सवय व व्यायामाचा अभाव यांमुळे कमी वयातच हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आहारात नेमके काय घ्यावे आणि काय टाळावे, याकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती व नामवंत हृदय शल्यचिकित्सक डॉ. श्रीराम नेने यांनी स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या तेलांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

डॉ. श्रीराम नेने हे कार्डिओथोरॅसिक सर्जन असून, ते छातीतील अवयवांवर विशेषतः हृदय, फुप्फुसे व अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागरूकता पसरवत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्यांनी हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी पाच स्वयंपाकाची तेलं सांगितली आहेत. मात्र, “कोणतेही तेल प्रमाणातच वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे स्पष्ट करीत त्यांनी संयमाचा सल्लाही दिला आहे.

हृदयासाठी सुरक्षित ‘ही’ ५ हेल्दी तेलं

१. तांदळाच्या कोंड्याचे तेल (Rice Bran Oil)

तांदळाच्या कोंड्याचे तेल हे पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड चरबीचे उत्तम स्रोत मानले जाते. या चांगल्या चरबीमुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. त्याशिवाय टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यासही हे तेल सहायक ठरू शकते.

२. भुईमूग तेल (Groundnut Oil)

भुईमूग तेलामध्ये चांगल्या प्रकारची चरबी तसेच जीवनसत्त्व ‘ई’ भरपूर प्रमाणात आढळते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात या तेलाचा वापर केल्यास संतृप्त चरबीऐवजी असंतृप्त चरबी शरीराला मिळते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे संतुलन राखण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहण्याची शक्यता वाढते.

३. मोहरीचे तेल (Mustard Oil)

मोहरीचे तेल हे पारंपरिक भारतीय स्वयंपाकात वापरले जाणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे तेल आहे. हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. तसेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवून धमन्यांमध्ये साचणारा प्लॅक कमी करण्यास सहायक ठरते. दाह कमी करण्याचे गुणधर्मही या तेलात आढळतात.

४. ऑलिव्ह तेल (Olive Oil)

ऑलिव्ह तेल हे जगभरात हृदयासाठी उपयुक्त मानले जाते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन रोखतात. त्यामुळे हृदयासोबतच मेंदूच्या आरोग्यासाठीही हे तेल फायदेशीर ठरू शकते.

५. तीळ तेल (Sesame Oil)

तीळ तेल हे ओमेगा-३, ओमेगा-६ व ओमेगा-९ फॅटी अ‍ॅसिड्सने समृद्ध असते. त्यामध्ये मॅग्नेशियम, लिग्नॅन्स, जीवनसत्त्व ‘ई’ आणि इतर अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक धमन्यांमध्ये प्लॅक साचण्यापासून संरक्षण करतात आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, हृदय निरोगी ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून न राहता, दैनंदिन आहारात छोटे, पण योग्य बदल करणे गरजेचे आहे. योग्य तेलाची निवड, मर्यादित वापर व संतुलित आहार यांमुळे हृदयाच्या आरोग्याची मजबूत पायाभरणी होऊ शकते.