Dr Shriram Nene Health Tips: आपण दिवसभरात अनेक छोट्या-मोठ्या सवयी नकळत अंगीकारतो. सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहणे, नाश्ता किंवा जेवण घाईघाईत करणे, तासन्तास एकाच जागी बसून राहणे आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे या गोष्टी आज अनेकांच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. सुरुवातीला या सवयी सामान्य वाटत असल्या तरी दीर्घकाळ त्यांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि प्रसिद्ध डॉक्टर डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर दैनंदिन जीवनातील अशाच काही सवयींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सतत बसून राहण्याच्या सवयीबद्दल इशारा देताना ‘Sitting is the new smoking’ म्हणजेच ‘बसून राहणं म्हणजे नवं स्मोकिंग’ असे म्हटले आहे. तर मग जाणून घेऊया कोणत्या सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक…
१. सकाळी उठल्यानंतर पुन्हा अलार्मचे स्नूझ बटण दाबू नका
अनेकांची सवय असते की, सकाळी अलार्म वाजल्यानंतर लगेच उठण्याऐवजी ते स्नूझ बटण दाबतात आणि पुन्हा झोपतात. मात्र, वारंवार अलार्म पुढे ढकलल्यामुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आळस आणि थकवा जाणवू शकतो. डॉ. नेने यांच्या मते, सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि शक्यतो ठरलेल्या वेळेत उठण्याची सवय लावा.
२. सकाळी उठताच मोबाईल पाहण्याची सवय टाळा
डोळे उघडताच मोबाईल हातात घेणे ही अनेकांची सवय झाली आहे. उठल्यानंतर लगेच सोशल मीडिया, मेसेजेस आणि बातम्या पाहिल्यामुळे मेंदूवर अनावश्यक माहितीचा आणि तणावाचा मारा होऊ शकतो. सकाळी पूर्णपणे जागे होण्यापूर्वीच मोबाईल पाहिल्याने लक्ष विचलित होऊ शकते. तसेच तणावपूर्ण बातम्या किंवा संदेशांमुळे अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे सकाळची पहिली एक ते दोन तासांची वेळ शक्यतो मोबाईलपासून दूर राहून स्वतःसाठी द्या.
३. रिकाम्या पोटी कॉफी पिणे चुकीचे आहे का?
अनेकांना सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कॉफी पिण्याची सवय असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटाचे नुकसान होते, अशी भीती अनेकांच्या मनात असते. डॉ. नेने यांच्या मते, बहुतांश लोकांमध्ये रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने गंभीर पचनविषयक समस्या निर्माण होत नाहीत. मात्र, कॉफीमुळे काही लोकांमध्ये पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते किंवा अॅसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाची शारीरिक प्रतिक्रिया वेगळी असू शकते.
४. जेवण घाईघाईत करण्याची चूक करू नका
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण जेवणही अगदी घाईघाईत करतात. मात्र, ही सवय पचनासाठी त्रासदायक ठरू शकते. घाईघाईत जेवल्यामुळे अन्न नीट चावले जात नाही. परिणामी, गरजेपेक्षा जास्त खाण्याची शक्यता वाढते. यामुळे अपचन, पोट फुगणे आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. डॉ. नेने यांच्या सल्ल्यानुसार, जेवताना प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. जेवणाच्या वेळी मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याऐवजी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.
५. दिवसभर पुरेसे पाणी प्या
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, डोकेदुखी आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात.
डिहायड्रेशनची काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
- वारंवार तहान लागणे.
- त्वचा कोरडी पडणे.
- सतत थकवा जाणवणे.
- लघवीचा रंग गडद होणे.
- नेहमीपेक्षा कमी लघवी होणे.
- त्यामुळे दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या. मात्र, पाण्याचे प्रमाण वय, शारीरिक हालचाली आणि आरोग्याच्या स्थितीनुसार बदलू शकते.
६. तासन्तास एकाच जागी बसून राहू नका
डॉ. श्रीराम नेने यांनी या सवयीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सतत बसून राहण्याच्या सवयीला त्यांनी ‘न्यू स्मोकिंग’ असे संबोधले आहे. अनेकजण ऑफिसमध्ये किंवा घरून काम करताना सलग अनेक तास खुर्चीवर बसून राहतात. यामुळे शरीराची हालचाल कमी होते, रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो आणि स्नायूंमध्ये आखडलेपणा जाणवू शकतो. दीर्घकाळ निष्क्रिय राहण्याचा संबंध हार्ट अटॅक, टाइप २ डायबिटीज आणि काही प्रकारच्या कॅन्सरच्या वाढलेल्या जोखमीशी आढळला आहे. त्यामुळे दर ३० ते ६० मिनिटांनी थोडा ब्रेक घ्या. काही मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग करणे किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.
७. झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे आणि अतिविचार करणे टाळा
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहण्याची सवय अनेकांना असते. सोशल मीडिया स्क्रोल करणे, व्हिडिओ पाहणे किंवा सतत मेसेज तपासणे यामुळे झोपेची वेळ पुढे ढकलली जाऊ शकते. मोबाईल आणि इतर स्क्रीनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशाचा झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे झोप लागण्यास विलंब होण्याची शक्यता असते. याशिवाय झोपण्यापूर्वी सतत विचार करत राहणे किंवा दिवसभरातील घटनांचा ताण घेणे यामुळेही झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपण्याच्या किमान ३० ते ६० मिनिटे आधी स्क्रीनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. शांत वातावरणात वेळ घालवा आणि नियमित झोपेचे वेळापत्रक पाळा.
छोट्या सवयींमध्ये बदल करून आरोग्य जपा
निरोगी राहण्यासाठी नेहमीच मोठे बदल करण्याची गरज नसते. सकाळी वेळेवर उठणे, मोबाईलपासून काही काळ दूर राहणे, सावकाश जेवणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित हालचाल करणे आणि रात्री वेळेवर झोपणे अशा छोट्या सवयी आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात.
सतत बसून राहणे, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव या सवयी दीर्घकाळ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे आजपासूनच आपल्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल करा.
