बाप्पांचा लाडका नैवेद्य म्हणजे मोदक. मागच्या काही काळापासून हाच मोदक विविध रंगांत, आगळ्यावेगळ्या स्टफिंगसह बाजारात मिळतात. हेच मोदक एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत यासाठी ठाण्यातील मिठाईवाल्यांच्या पुढाकाराने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या मिसळ एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिसळ महोत्सवानंतर आता हा मोदक महोत्सव ठाणे आणि परिसरातील नागरिकांसाठी एक उत्तम संधी असणार आहे. हा महोत्सव सप्टेंबर महिन्याच्या ८ आणि ९ तारखेला आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. याठिकाणी काजू पेस्टचे, बदामाचे, पंचखाद्याचे अशा असंख्य प्रकारांचे मोदक एकाच छत्राखाली चाखण्याची संधी गणेशभक्तांना आणि खवय्यांना मिळणार आहे.

गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ याबरोबरच महाराष्ट्रातील एक खास स्वीट डिश म्हणूनही मोदकाची ओळख आहे. मागच्या काही वर्षात मोदकाचा व्यवसाय झपाट्याने विकसित झाला. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचे दर्शन या महोत्सवात एकाच ठिकाणी होणार आहे. भारतीय पारंपारिक मिठाई बनवणारे ७५ हून अधिक उत्पादक-विक्रेते यानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. ठाणे पश्चिमेकडील तीनहात नाका येथील ‘ठाणे क्लब’मध्ये हा दोन दिवसांचा महोत्सव संपन्न होणार आहे.

पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीचा आपल्यावर असणाऱ्या प्रभावामुळे आपले पारंपरिक पदार्थ काही प्रमाणात मागे पडतात. चॉकलेट, केक यांसारख्या पदार्थांना आपण प्राधान्य देत असल्याने आपल्या देशात जन्मलेल्या मिठाईच्या पदार्थांचीच आज उपेक्षा व्हायला लागली आहे. आपल्या समृद्ध गोडधोड परंपरेचा वारसा आजच्या पिढीलाही कळावा”, यासाठीच मोदक महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मोदक महोत्सवाचे आयोजक ‘मीठा इंडिया’चे निमंत्रक कॅप्टन कमल चढ्ढा यांनी दिली. मोदक महोत्सवात महाराष्ट्रातील अनेक मिठाई उत्पादक-व्यापारी आपापले वैशिष्ट्यपूर्ण मोदक खवय्यांसाठी सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आहे, ती जपणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मोदक हे या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळे मोदक महोत्सव म्हणजे गणरायाप्रमाणे इथल्या खाद्यसंस्कृतीलाही केलेलं वंदनच आहे.” असे मत ‘कांतीलाल दामोदर मिठाईवाला’चे संस्थापक-संचालक मनोज कांतीलाल सोनी यांनी व्यक्त केले. चॉकलेट खाद्यपदार्थांसाठी भारत ही सर्वाधिक वेगाने विस्तारणारी बाजारपेठ आहे. पाश्चात्य गोडपदार्थांना जमेल तितका आळा घालून भारतीय मिठायांना उत्तेजन देण्यासाठी तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी ‘मोदक महोत्सव’ महत्वाची भूमिका बजावेल, असं मतही कॅप्टन चड्ढा म्हणाले.