Breast cancer symptoms: भारतातील अनेक महिला स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी, जिने या आजाराचे दुःख सोसले आणि नुकताच आपला अनुभव जगासमोर मांडला. ‘यंग वूमन ब्रेस्ट कॅन्सर कॉन्फरन्स २०२५’ मध्ये एएनआयशी झालेल्या संवादात महिमाने स्तनाच्या कर्करोगावरील उपचार आणि चाचण्यांमध्ये तिला आलेल्या अडचणींबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. त्यासोबतच तिने कर्करोगाच्या काळात सहन केलेल्या वेदनांबद्दलही माहिती दिली. आम्ही तुम्हाला सांगतो की, २०२२ मध्ये महिमाला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते.

महिमाने सांगितले की, हा आजार तिच्यासाठी मानसिक आणि शारीरिक आव्हान कसा ठरला आणि कसा संघर्ष करीत तिने त्याचा सामना केला. तिने महिलांना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे, वेळेवर तपासणी करून घेण्याचे आणि स्वतःच्या काळजीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तिच्या अनुभवामुळे उपस्थित महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान अचानक झाले

महिमाने सांगितले की, तिच्या कर्करोगाचे निदान पूर्णपणे अनपेक्षितपणे झाले. तिला कोणतीही लक्षणे जाणवली नव्हती. ती म्हणाली, “मी कोणत्याही विशिष्ट तक्रारीमुळे तपासणीसाठी गेले नव्हते. मी फक्त माझ्या वार्षिक तपासणीसाठी गेले होते. मला कर्करोग आहे याची मला कल्पनाच नव्हती. तपासणीशिवाय कर्करोग अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाही. त्यामुळे जर महिलांनी नियमित तपासणी करून घेतली, तर कर्करोगाचे लवकर निदान होऊ शकते आणि उपचार लवकर सुरू करता येतात.”

महिमाची कहाणी अशा लाखो महिलांसाठी एक इशारा आहे, ज्यांच्या स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, अनेक प्रकरणांमध्ये महिलांना त्यांच्या स्तनात गाठी, वेदना किंवा सूज असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे स्क्रीनिंग आणि मॅमोग्राफीसारख्या वार्षिक तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

स्तनाचा कर्करोग आणि त्याची लक्षणे

स्तनाचा कर्करोग हा स्तनातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. याचा अर्थ असा की, स्तनातील सामान्य पेशी अचानकपणे असामान्यपणे वाढू लागतात आणि त्यांची गाठ किंवा ट्यूमर तयार होतो. या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे वेळेवर निदान करणे कठीण होते.

तथापि, या विकाराची काही सामान्य चिन्हे आहेत, ज्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ती चिन्हे खालीलप्रमाणे :

स्तनामध्ये गाठ किंवा जाडसरपणा जाणवणे : हे अनेकदा कर्करोगाचे पहिले आणि सर्वांत सामान्य लक्षण असते.

स्तनाग्रातून असामान्य गळती किंवा रक्तस्राव : जर कोणत्याही कारणाशिवाय स्तनातून किंवा स्तनाग्रातून द्रव गळत असेल, तर ते गांभीर्याने घेतले पाहिजे.

स्तन किंवा स्तनाग्राच्या आकारात किंवा रंगात बदल : स्तनांच्या आकारात अचानक बदल होणे किंवा स्तनाग्र असामान्यपणे गडद किंवा लाल होणे हे एक धोक्याचे लक्षण असू शकते.

त्वचेतील बदल : स्तनांच्या त्वचेवर खड्डे पडणे, लालसरपणा किंवा सूज येणे.

महिमा चौधरी यांच्या अनुभवावरून असे दिसून येते की, स्तनाचा कर्करोग कधी कधी कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी नियमितपणे स्वतःची तपासणी करावी आणि डॉक्टरांकडूनही वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. या आजाराचे लवकर निदान होण्यासाठी आणि त्यावर योग्य उपचार सुरू व्हावेत यासाठी वेळेवर निदान आणि सक्रिय देखरेख हे सर्वांत प्रभावी मार्ग आहेत.

भारतातील कर्करोग उपचारांमध्ये बदल

महिमाने हेही सांगितले की, गेल्या तीन ते चार वर्षांत भारतातील कर्करोगाच्या उपचारांत लक्षणीय बदल झाला आहे. ती म्हणाली, “अनेक जेनेरिक औषधे अधिक परवडणारी झाली आहेत. औषध कंपन्यांकडून मिळणारा पाठिंबा सुधारला आहे आणि कर्करोगाबद्दलची जागरूकताही वाढली आहे. इतर लोकांचा संघर्ष पाहून मला प्रोत्साहन मिळाले आहे.”

वेळेवर तपासणी करण्याचा संदेश

महिमाची कहाणी एक महत्त्वाचा संदेश देते. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी लवकर निदान हाच सर्वोत्तम उपाय आहे. महिलांनी वार्षिक आरोग्य तपासणी, मॅमोग्राम व इतर तपासण्या वेळेवर करून घ्याव्यात आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. महिमा म्हणते, “जर तुम्ही नियमित आरोग्य तपासणी केली, तर कर्करोगाचे लवकर निदान होऊ शकते आणि उपचार सुरू करता येतात. आपले जीवन वाचवण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.”