scorecardresearch

तेलकट त्वचेला वैतागलात? काकडीचा असा होईल उपयोग

केमिकलयुक्त प्रसाधानांच्या वापरामुळे त्वचा काही काळ चांगली दिसत असली तरी सततच्या वापराने त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

तेलकट त्वचेला वैतागलात? काकडीचा असा होईल उपयोग
काकडीचे फायदे

पुर्वीपासून आपण आजीच्या बटव्यातल्या खास गोष्टींचा वापर करत आलेलो आहोत. अगदी लहान मुल असो किंवा वयस्क व्यक्ती, वेळ आल्यावर आजीचा बटवाच आपल्या कामी येतो. कालांतराने या बटव्यामध्ये नवनवीन गोष्टींची भर पडत गेली. केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून आपण आपल्या सौंदर्यांत भर पाडू शकतो. सध्या अनेक तरुणी सुंदर दिसण्याच्या नादात विचार न करता नवनवीन प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. काही तरुणी तर यावर भाळून ही प्रसाधने विकत घेतात. मात्र या केमिकलयुक्त प्रसाधानांच्या वापरामुळे त्वचा काही काळ चांगली दिसत असली तरी सततच्या वापराने त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

प्रवासादरम्यान अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे हे धुलीकण चेह-यावर जमा होतात. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात. तसचे प्रखर उन्हाचा सतत भडीमार झाल्यामुळेही त्वचा टॅन होते. सूर्यामधून बाहेर पडणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव सरळ आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते. ही काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ करण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.

१. काळवंडलेली त्वचा तसेच तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी अनेक वेळा टोनरचा वापर केला जातो. टोनिंग केल्याने चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरा पुर्ववत होण्यास मदत होते.

२. टोनर हे एक प्रकारचे अॅस्ट्रिंजेट आहे. मात्र बाजारात मिळणारे टोनर केमिकलयुक्त असते. यामुळे चेह-याला त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होता. या कारणामुळे बाजारात मिळणा-या टोनरपेक्षा जर घरी असलेल्या साधनांचा वापर करुन टोनिंग केले तर चेह-याची हानी होणारी नाही. टोनिंगसाठी काकडी हा सर्वात्तम पर्याय आहे. काकडीमध्ये अँटीऑक्सि़डंट, अँटी बॅक्टीरिअल, अँटी फंगल याव्यतिरिक्त अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. ही पोषकतत्वे त्वचेची हानी होण्यापासून वाचवतात.

३. त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करत असून काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो. या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरच्या सहाय्याने बारीक करुन तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन रोज दिवसातून दोन वेळा चेह-यावर शिंपडल्यास चेह-याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

४. दरम्यान, अवनीन वर्मा यांनी स्पष्ट केलेल्या काही मुद्द्यांनुसार, काकडी, लिंबू आणि मध यांच्या मिश्रणाचे टोनरही उपयुक्त असते. याच्या वापरामुळे चेह-यावरील डाग कमी होतात. तसेच मध नैसर्गिकरित्या ब्लिचचे कामही करते.

५. काकडीचा रस काढल्यानंतर राहिलेला चोथा फेकून न देता त्याचा उपयोग फेसपॅक तयार करण्यासाठीही होऊ शकतो. त्याप्रमाणेच डोळ्यांखालील वर्तुळे कमी करण्यासाठी आयमास्क म्हणूनही वापर करु शकतो. त्यामुळे काकडी केवळ जेवणाची चव वाढविण्यासाठी नसून शारीरिक सौंदर्यात भर घालण्याचेही काम करताना दिसून येते.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-05-2018 at 17:23 IST

संबंधित बातम्या