१. जास्तीत जास्ती नैसर्गिक स्वरूपातील पदार्थांचं महत्त्व मुलांना समजावून द्या. यांत्रिक प्रक्रिया झाल्यावर पदार्थातील सत्त्वयुक्त भाग कमी होतो, पदार्थाचं पोषण, कमी होतं. त्यामुळे काय खातो त्यापेक्षा खाल्लेल्या किती भागाचं रक्तात रुपांतर होतं, म्हणजेच शरीराला उपयोग होतो याची जाणीव मुलांना करून द्या.
२. भाजी बाजारात फेरफटका मारून ताजी हिरवीगार भाजी, फळ पाहायची, हाताळायची, ओळखायची संधी मुलांना द्या.
धान्य, डाळींचे प्रकार, मसाल्याचे पदार्थ दाखवा, त्यांची माहिती द्या.
३. पदार्थांच्या गुणवत्तेविषयी, त्यांच्या शरीरातील कार्याविषयी मुलांशी चर्चा करा. सोप्या शब्दात समजावून सांगा.
४. घरी सोपे सोपे पदार्थ करताना मुलांची मदत घ्या. भाज्या निवडणं, शेंगातून दाणे काढणं, फळं सोलणं, कडधान्यांना मोड आणणं अशांतून मुलांना, खाण्यापिण्याची आवड तयार होईल.
५. मुलांना स्वतः सोपे पदार्थ करून बघायची संधी द्या.
६. थोड्या मोठ्या मुलांना घरच्या दिवसभराच्या मेनू प्लानिंग मधे सामावून घ्या. त्यावेळीच समतोल आहाराविषयी चर्चा करा.
७. घरी जेवताना, शाळेत डबा खाताना जेवणावर लक्ष केंद्रित करून, सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला शिकवा.
बेबी कोर्न कनापीज
साहित्य : बेबी कोर्न- ५-६, फ्रेंच ब्रेड लोफ- १, टोमॅटो प्युरी- अर्धी वाटी, टोमाटो सॉस- अर्धी वाटी, कॉर्न फ्लॉवर- २ चमचे, चीज- ५० ग्राम, सोया सॉस- २ चमचे, व्हिनेगर- १ चमचा, लसूण बारीक चिरून- १ चमचा, मिरपूड- १ चमचा, लाल तिखट- १ चमचा, ओरिगानो पावडर- १ चमचा, पुदिना बारीक चिरून- १/४ वाटी, मीठ- चवीनुसार.
कृती : बेबी कोर्न टॉपिंगसाठी बेबी कोर्नच्या गोल जाडसर चकत्या कापून घ्या. एका बाऊलमधे १/४ वाटी टोमॅटो सॉस, सोया सॉस, मिरपूड, मीठ, व्हिनेगर घालून ढवळून घ्या. कॉर्नफ्लोअरची पाण्याबरोबर पेस्ट करून घ्या, बाऊलमधील मिश्रणात घालून एकजीव करा. गॅसवर पॅन गरम करून त्यात सर्व एकत्र केलेलं मिश्रण घालून २ मिनिटं शिजवा. बेबी कॉर्नच्या चकत्या घाला. २-३ चमचे पाणी घालून ढवळून घ्या. बेबी कॉर्नच्या चकत्यांना मिश्रण कोट झालं की गॅस बंद करा.
सॉससाठी- गॅसवरील पॅनमधे टोमॅटो प्युरी, १/४ वाटी टोमॅटो सॉस, बारीक चिरलेला लसूण, लाल तिखट, ओरिगानो पावडर, मिरपूड आणि मीठ घालून ढवळून घ्या. २ मिनिटं ढवळून गॅस बंद करा. फ्रेंच लोफचे मध्यम जाडीचे स्लाईस करून घ्या. चीज किसून घ्या. कानापीज बनवण्यासाठी, ब्रेडच्या स्लाईसला सॉस लावून घ्या. त्यावर बेबी कॉर्न टॉपिंग पसरा, चीज घाला. पुदिन्याची चिरलेली पानं पसरा. मिरपूड, लाल तिखट आणि मीठ भुरभुरा. प्रीहिट केलेल्या ओव्हन मधे २०० डिग्रीला ७-८ मिनिटे ग्रील करा.
शक्य झालं तर व्हीट किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरा.