Health benefits of makhana or peanuts : जेव्हा जेवणाआधीच्या मधल्या वेळेत भूक लागते. तेव्हा तुम्ही निवडलेला स्नॅक तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत किंवा अडथळा देखील आणू शकतो. शेंगदाणे आणि मखाणे (फॉक्स नट्स) हे भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेले दोन पर्याय अनेकदा आरोग्यदायी मानले जातात. पण, यांपैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे? याबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ शालिनी ब्लिस यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार याचे उत्तर इतके सोपे नाही की, फक्त एका पर्यायाची निवड करावी आणि दुसरा टाळावा.
कॅलरीज विरुद्ध पोषण
वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे आणि मखाना दोन्ही चांगले पर्याय असू शकतात. पण, कोणता पर्याय अधिक चांगला आहे याचे प्रमाण वैयक्तिक गरजेवर अवलंबून असतात. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज जास्त असतात .कारण – त्यात चांगले (आरोग्यदायी) फॅट्स जास्त प्रमाणात असतात. तर मखाना हलका असतो आणि एका वाटीच्या प्रमाणात कॅलरीज तुलनेने कमी असतात.
जर कोणी कमी कॅलरीज असलेला आणि खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटणारा नाश्ता शोधत असेल, तर मखाना हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पण, शेंगदाणे खाल्यावरही अधिक प्रथिने आणि आरोग्यदायी (हेल्दी फॅट्स) मिळतात; त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.
कोणत्या गोष्टीमुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहू शकते?
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने (प्रोटीन), आरोग्यदायी फॅट्स (हेल्दी फॅट्स) आणि तंतूमय पदार्थ (फायबर) यांचे मिश्रण असल्याने तुमचे पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत होते. यामधील पोषक घटक पचनक्रिया मंदावतात आणि भूक कमी करतात. दुसरीकडे, दीर्घकाळाचा विचार करायचा असेल तर मखाण्यामुळे तुमचे पोट जास्त वेळ भरलेलं राहणार नाही. मखाणा हलका आणि कुरकुरीत असल्याने मोठ्या प्रमाणात खाणे सोपे असते. पण, त्यातून दीर्घकाळ पोट भरल्याची भावना मिळण्याची शक्यता फारच कमी असते.
अति खाणे टाळून आहारात समावेश कसा करावा?
काही मंडळी विचार न करता जास्त प्रमाणात खाणे पसंत करतात. पण, प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आणि जाणीवपूर्वक खाणे हीच गुरुकिल्ली आहे; असे तज्ज्ञ म्हणतात. शेंगदाणे खाताना त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिरिक्त कॅलरीज न घेता पोषक तत्वे मिळवण्यासाठी मूठभर म्हणजेच साधारण २० ते ३० ग्रॅम शेंगदाणे पुरेसे असतात. मीठ लावलेले किंवा तळलेले शेंगदाणे खाण्याऐवजी साधे किंवा भाजलेले शेंगदाणे निवडणे अधिक चांगले अठरू शकते.
त्याचबरोबर मखाण्यांच्या बाबतीतही योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. घरी अगदी कमी तेलात भाजल्यास आणि जास्त मसाले न वापरल्यास मखणा खाण्यास आरोग्यदायी असतात. तज्ज्ञ एक सोपी सवय सांगतात की, पॅकेटमधून थेट खाण्याऐवजी आधी योग्य प्रमाणात घ्या आणि हे पदार्थ संतुलित आहाराबरोबर खा.
