Is makhana healthier than popcorn : वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी निवडणे खूप जास्त कठीण जाते. तुम्हाला काहीतरी कुरकुरीत, चटपटीत आणि मनाला समाधान देणारे पदार्थ खायचे असतात. पण, त्याच वेळी असे काहीतरी हवे असते ज्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जाणार नाहीत. ‘मखाना’ आणि ‘पॉपकॉर्न’ हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत, ज्यांना चिप्स किंवा इतर पॅकबंद स्नॅक्सपेक्षा अधिक चांगला पर्याय मानले जाते. पण, वजन कमी करायचे असल्यास तुम्ही यापैकी कशाची निवड करावी? याबद्दल जाणून घेण्यासाठी ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा.

मखाना वजन कमी करण्यास मदत करतो का?

मखाना ज्याला ‘फॉक्स नट्स’ असेही म्हणतात. यामध्ये नैसर्गिकरित्या चरबीचे (फॅट) प्रमाण कमी असते आणि काही प्रमाणात प्रथिने (प्रोटिन) व फायबर असतात, जरी यात प्रथिनांचे प्रमाण जास्त नसते.

‘फूड प्रॉडक्शन, प्रोसेसिंग अँड न्यूट्रिशन’ (Food Production, Processing and Nutrition) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात भाजलेल्या मखान्यांचे विश्लेषण करण्यात आले. यात असे दिसून आले की, मखान्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्स’ (GI) कमी असतो आणि त्यात प्रथिने व इतर पोषक घटक असतात.

संशोधकांच्या मते, मानवी सहभागींवर केलेल्या अभ्यासात मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) सुमारे ३७ आढळला. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू नये, याची काळजी घेत असाल आणि काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असेल, तर भाजलेले मखाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मात्र, याचा अर्थ असा नाही की, मखाना वजन कमी करण्यासाठी अगदी योग्य आहे. १०० ग्रॅमच्या प्रमाणे विचार केल्यास, मखाना हा अधिक ऊर्जा (कॅलरीज) देणारा पदार्थ ठरू शकतो. त्यामुळे मखाने मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. तसेच, मखाने भाजताना किती प्रमाणात तूप किंवा तेल वापरले जाते, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी पॉपकॉर्न चांगला पर्याय ठरू शकतो का?

पॉपकॉर्नचा एक मोठा फायदा म्हणजे, कमी कॅलरीजमध्ये ते जास्त प्रमाणात खाता येतात. त्यामुळे कमी कॅलरीज घेतल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटू शकते. पॉपकॉर्न हा एक ‘होल ग्रेन’ (पूर्ण धान्य) असून त्यात फायबर असते, त्यामुळे इतर अनेक स्नॅक्सच्या तुलनेत खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. पोषणतज्ज्ञ शिल्पा अरोरा यांच्या मते, पॉपकॉर्नमधील फायबर कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट्स) रक्ताभिसरणात जाण्याचे प्रमाण मंदावते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी साधे पॉपकॉर्न एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र, त्यांनी बटर जास्त प्रमाणात वापरलेले पॉपकॉर्न खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

पॉपकॉर्न खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, यालाही संशोधनाचा आधार आहे. एका अभ्यासात असे आढळले की, बटाट्याचे चिप्स खाणाऱ्यांच्या तुलनेत पॉपकॉर्न खाणाऱ्या लोकांना अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटले आणि भूकही कमी लागली. त्यामुळे त्यांनी दिवसभरातील जेवण आणि स्नॅक्समधून कमी कॅलरीज घेतल्या.

मात्र, येथे साध्या पॉपकॉर्नला महत्त्व आहे. लोणी, चीज, कॅरॅमल किंवा साखरेचा थर असलेले पॉपकॉर्न आणि साधे पॉपकॉर्न यांमध्ये फरक असतो. एअर-पॉप पद्धतीने किंवा कमी तेलात तयार केलेले पॉपकॉर्न हा तुलनेने हलका पर्याय ठरू शकतो. याउलट, त्यात जास्त लोणी, चीज किंवा साखर घातल्यास कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.

मखाना की पॉपकॉर्न; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय चांगला ?

जर तुम्हाला कमी कॅलरीजमध्ये जास्त प्रमाणात खाऊन पोट भरलेले ठेवायचे असेल, तर साधे पॉपकॉर्न हा चांगला पर्याय ठरू शकतो. पॉपकॉर्न हे संपूर्ण धान्य (Whole Grain) आहे. ते खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होण्यास मदत होते, असे काही अभ्यासांमध्ये आढळले आहे.

मखानादेखील एक चांगला पर्याय आहे. विशेषतः कोरडे भाजलेले किंवा अगदी कमी तेलात तयार केलेले मखाने खाणे फायदेशीर ठरू शकते. त्यात नैसर्गिकरीत्या चरबीचे प्रमाण कमी असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी असतो. मात्र, मखाने आरोग्यदायी आहेत म्हणून ते अमर्यादित प्रमाणात खाणे योग्य नाही.

थोडक्यात सांगायचे तर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर साधे पॉपकॉर्न मखान्यापेक्षा थोडे अधिक फायदेशीर ठरू शकतात. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण तुलनेने कमी असते आणि ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. असे असले तरी, वजन कमी करण्याच्या आहारात मर्यादित प्रमाणात भाजलेल्या मखान्यांचाही समावेश करू शकता. दोन्ही पदार्थ खाताना त्यात कोणते अतिरिक्त पदार्थ (टॉपिंग्स) घालता आणि किती प्रमाणात खाता, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.