Mallika Sherawat Fitness Secret at 49: बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत असतात. पण, काही कलाकार असे असतात जे वाढत्या वयातही आपल्या फिटनेसने लोकांना थक्क करून सोडतात. सध्या अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे, कारण वयाच्या ४९ व्या वर्षीही तिचा फिटनेस आणि ग्लो पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. इतक्या वर्षांनंतरही ती स्वतःला इतकी फिट आणि ऊर्जावान कशी ठेवते, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. अखेर मल्लिका शेरावतने स्वतःच तिच्या फिटनेसचं गुपित चाहत्यांसमोर उघड केलं आहे.
अलीकडेच मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केल्या. या पोस्टमध्ये ती योगा करताना आणि जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. मात्र फक्त व्यायामच नाही, तर फिट राहण्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे, हेही तिने स्पष्ट सांगितलं आहे.
मल्लिका म्हणाली की, फिटनेससाठी वय महत्त्वाचं नसतं, तर सातत्य महत्त्वाचं असतं. शरीराची योग्य काळजी घेतली तर शरीरही आपली साथ कधीच सोडत नाही. ती रोज सकाळची सुरुवात हलक्या योगा आणि स्ट्रेचिंगने करते. तिच्या मते, रोज थोडीफार हालचाल केली तरी त्याचा शरीरावर खूप चांगला परिणाम दिसून येतो.
तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, कोणतेही शॉर्टकट वापरून शरीर फिट राहत नाही. शरीर घडवण्यासाठी रोज मेहनत घ्यावी लागते. काही दिवस मन नसतानाही व्यायाम सुरू ठेवावा लागतो, कारण शरीर तेव्हाच बदलायला सुरुवात करतं, जेव्हा मन त्यासाठी तयार होतं.
विशेष म्हणजे मल्लिका शेरावत फक्त व्यायामावरच भर देत नाही, तर ती तिच्या आहाराबाबतही खूप जागरूक आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, ती अनेक वर्षांपासून व्हेगन डाएट फॉलो करत आहे. म्हणजेच ती दूध, पनीर, चीज, लस्सी किंवा कोणतेही प्राण्यांपासून तयार होणारे पदार्थ खात नाही.
तिच्या दैनंदिन आहारात प्रामुख्याने फळं, हिरव्या भाज्या, सॅलेड आणि हलकं अन्न असतं. सकाळच्या नाश्त्यात ती भरपूर ताजी फळं खाते. विशेष म्हणजे, आंबा हे तिचं आवडतं फळ असल्याचंही तिने सांगितलं आहे.
मल्लिका म्हणाली की, गोड खाण्याची इच्छा झाली तर ती फक्त खजूर खाते. याशिवाय भेंडी ही तिची आवडती भाजी आहे. ती नियमितपणे शिजवलेली भेंडी खाते. तसेच हिरव्या भाज्या, सॅलेड आणि ॲवोकॅडो यांचाही तिच्या आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
तिला थाई ग्रीन करी खूप आवडते, कारण ती नारळाच्या दुधापासून बनवली जाते आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात मसाले असतात, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्यही चांगलं राहतं असं ती सांगते.
मल्लिका शेरावतने तिच्या चाहत्यांनाही एक प्रश्न विचारला. तिने विचारलं की, फिटनेस सुरू करणं कठीण वाटतं की सातत्य ठेवणं? तिच्या या प्रश्नावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक फिटनेससाठी शॉर्टकट शोधतात. मात्र, मल्लिका शेरावतच्या मते फिट राहण्यासाठी कोणतीही जादू नसते. रोजचा व्यायाम, साधा आहार, योगा आणि सातत्य यामुळेच शरीर निरोगी राहतं.
वय वाढलं तरी स्वतःची काळजी घेतली, योग्य आहार घेतला आणि नियमित व्यायाम केला तर शरीर दीर्घकाळ तंदुरुस्त राहू शकतं, हेच मल्लिका शेरावतने तिच्या जीवनशैलीतून दाखवून दिलं आहे, त्यामुळे तिचा फिटनेस पाहून आजही अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
