मनोमनी : डॉ. अद्वैत पाध्ये

घरात लहान मूल असणे ही आनंदाची पर्वणी असते; परंतु हे मूल जेव्हा मोठे होते, शाळेत जायला लागते, फुलायला लागते तेव्हा कारणांमुळे निराशेच्या गर्तेत जाऊ  शकते. परिणामी फुलण्याच्या अवस्थेतच त्यांच्या या लक्षणांकडे वेळीच लक्ष नाही दिले तर या कळ्या कोमेजून जाण्याचा धोका अधिक असतो.

अगदी लहान मुलांपेक्षा पौगंडावस्थेत आणि किशोरवयात नैराश्याने ग्रासण्याचे प्रमाण जास्त असते. जवळपास १० ते २० टक्के मुलांना नैराश्य येऊ  शकते, असे संशोधन सांगते. एकदा पालक त्यांच्या नऊ  वर्षांच्या मुलाला घेऊन आमच्याकडे आले होते. शाळेत जायला म्हणून घरातून निघतो आणि शाळा सुटल्याच्या वेळेवर घरी येतो; परंतु शाळेतच जात नाही, चांगले गुण मिळविणारा आमचा मुलगा अभ्यासच करत नाही, अशी त्यांची तक्रार होती. अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यावर लक्षात आले की, त्याची लहान बहीण आणि आई-बाबा यांच्याविषयी त्याच्या मनात अढी होती. असुरक्षिततेची भावना मनात वाढून निराशा आली होती आणि त्या भरात लक्षवेधी वर्तन नकळत होत होते. बालकांमध्ये ताणतणाव निर्माण होतो, तेव्हा त्याची लक्षणे थोडी वेगळी असतात. ती नात्यातून किंवा त्यांच्या कामातून दिसून येतात.

शाळेत जाण्याच्या वेळेस डोकेदुखी, पोटदुखी होणे, चक्कर येणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे, झोप कमी येणे व झोपेत भीतीदायक स्वप्ने पडणे किंवा दुसऱ्या टोकाची म्हणजे भूक वाढणे, जंक फूड खाण्याची इच्छा होणे, वजन वाढून स्थूलपणा येणे, झोप वाढून कुंभकर्णी होणे यांसारखी लक्षणेदेखील मोठय़ा प्रमाणात दिसतात. मुलामुलींमध्ये वयात येण्याची प्रक्रिया लांबणे वा खूप लवकर येणे यांसारखी लक्षणेही प्रकर्षांने आढळतात. कुमारवयीन मुलांमध्ये हिंसक होणे, व्यसनांकडे वळणे, स्वैर लैंगिकतेकडे वळणे, असामाजिक वर्तन घडणे यांसारखी तसेच स्वत:ला किंवा इतरांना इजा करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे ही लक्षणेही आता वाढल्या प्रमाणात दिसतात, तर लहान मुलांमध्ये चिडचिड, अतिचळवळेपणा, मनाला येईल तसे वागणे, खोटे बोलणे ही लक्षणे दिसतात.

अशी लक्षणे दिसली की सर्वसाधारणपणे मुलांना नैतिकतेच्या, पालकत्वाच्या चष्म्यातून बघितले जाते. टीकात्मक किंवा अतिचिंतातुर दृष्टिकोन पालकांकडून वापरला जातो. ज्यामुळे मुलांची चिंता, नैराश्य त्याद्वारे होणारे चुकीचे किंवा दोषात्मक वर्तन वाढायला मदत होते.

लहान वयातील नैराश्याची जैविक कारणे ही सर्वसामान्यपणे मोठय़ा वयातील नैराश्याप्रमाणेच असतात. संप्रेरकांमधील असंतुलन, जीवरासायनिक संप्रेरकांमधील असंतुलन

यामुळेच नैराश्याची लक्षणे लहान मुलांमध्ये दिसतात; परंतु या वयात सर्वात महत्त्वाचे ठरते ते वातावरण! कुटुंब आणि शाळा हे यांच्या वयातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. पालक, शिक्षकांनी मुलांचे वागणे मापण्यापेक्षा सुसंवादी चालकाच्या भूमिकेतून पाहणे किंवा अनुभवणे महत्त्वाचे आहे.

अनेकदा मुलांची लक्षणे अनाकलीय असतात. मुलेही लहान असल्यामुळे किंवा भीतीने सांगू शकत नाहीत. तेव्हा अशा वेळेस मानसशास्त्रीय कसोटय़ांद्वारे त्यांचे मन नकळत उलगडले जाते. मुलांच्या नैराश्यावरील उपचारांमध्ये समुपदेशन, औषधोपचार महत्त्वाचे ठरतात. याहूनही अधिक महत्त्वाचे आहे त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे समुपदेशन. थोडक्यात कोमजणाऱ्या या कळ्यांना हळुवार थोडी थोडी फुंकर घालून पुन्हा उमलण्यात मदत केली जाऊ  शकते.