मारुती सुझुकी कंपनीने आपल्या डिझेल वाहनांचे उत्पादन पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून थांबवण्याचे यापूर्वीच जाहीर केलंय. प्रदूषणविषयक ‘बीएस-6’ नियमावली लागू होणार असल्याने कंपनीने हा निर्णय घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने आता आपल्या 1.3-लिटर डीझेल इंजिन प्रकारातील Ertiga कारचं उत्पादन बंद केलंय.

परिणामी, आता Ertiga कार केवळ 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1.5 लिटर पेट्रोल इंजिन प्रकारातच उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुनही Ertiga 1.3-लिटर डीझेल इंजिनचा पर्याय हटवण्यात आला आहे. एकमेव 1.5 लिटर डिझेल इंजिन कारचं उत्पादन देखील एक एप्रिल 2020 पासून थांबवलं जाणार आहे.

Ertiga ची 1.3-लिटर डीझेल इंजिन कार LDi, VDi, ZDi, ZDi+ अशा चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होती. 8.85 लाख रुपयांपासून या कारची किंमत होती. तर, 1.5 लिटर डिझेल इंजिन कार केवळ VDi, ZDi, ZDi+ अशा तीन व्हेरिअंटमध्येच उपलब्ध आहे. 1.3-लिटर डीझेल इंजिनचं उत्पादन थांबवल्याचा परिणाम 1.5 लिटर डिझेल इंजिनच्या किंमतीवर झाला असून या कारची किंमत जवळपास एक लाख रुपयांनी वाढली आहे. आता या कारची किंमत 9.87 लाख रुपयांपासून पुढे आहे. ऑबर्न रेड, मॅग्मा ग्रे, ऑक्सफोर्ड ब्ल्यू , आर्कटिक व्हाइट आणि सिल्की सिल्वर अशा पाच रंगांमध्ये ही कार उपलब्ध असेल.

यानंतर, 21 ऑगस्ट रोजी कंपनी Ertiga वर आधारित सहा आसनी प्रीमियम एमपीव्ही कार XL6 लाँच करणार आहे. यामध्ये अनेक प्रीमियम फीचर्स असणार आहेत. प्रीमियम डिलरशीप नेक्साद्वारे नव्या एक्सएल6 ची विक्री केली जाईल असं कंपनीने स्पष्ट केलंय.