Matka Water Cooling Tips: आजच्या आधुनिक युगात फ्रिज प्रत्येक घरात दिसतो. शहर असो किंवा गाव थंड पाण्यासाठी फ्रिज हा सर्वांत सोपा पर्याय बनला आहे. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का? फ्रिजमध्ये थंड केलेलं पाणी आणि मडक्यातील पाणी यांची चव आणि गारवा यांत वेगळाच फरक असतो. म्हणूनच आजही अनेक जण उन्हाळ्यात मडक्याचं पाणीच पसंत करतात. मात्र, एक प्रश्न अनेकांना पडतो की, मडक्यातील पाणी कधी कधी नीट गार का होत नाही? याचं उत्तर दडलंय एका जुन्या, पारंपरिक आणि थोड्याशा ‘गुपित’ असलेल्या ट्रिकमध्ये!
सोशल मीडियावर सध्या एक जुनी पद्धत जोरदार व्हायरल होत आहे. दावा असा की, ही १०० वर्षांपूर्वीची आजी-आजोबांची ट्रिक वापरली, तर मडक्यातील पाणी अगदी बर्फासारखं गार होतं. चला, जाणून घेऊया ही भन्नाट पद्धत…
पहिला टप्पा: मिठानं करा मडक्याची स्वच्छता
- नवं मडकं घेतल्यानंतर ते फक्त पाण्यानं धुऊन चालत नाही. सुरुवातीला मडक्यात पाणी भरून ते रात्रभर ठेवावं. दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाका.
- त्यानंतर मडक्याच्या आत मीठ टाकून थोड्या पाण्यासह हलवत स्वच्छ करा.
- महत्त्वाची गोष्ट म्हणजे मडक्याच्या आत हात घालू नका! त्यामुळे त्याची रचना खराब होऊ शकते.
- मडक्याच्या बाहेरील भागावरही मीठ टाकून स्क्रबरने हलक्या हाताने घासून स्वच्छ करावं. त्याचप्रमाणे झाकणही स्वच्छ धुवावं.
दुसरा टप्पा: तुरटीचा जादुई वापर
- मडकं स्वच्छ केल्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरा. आता तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात एक मिनीट फिरवा.
- ही पद्धत पाण्यातील अशुद्धता कमी करण्यास मदत करते, असं सांगितलं जातं. त्यानंतर ते पाणी टाकून द्या आणि मडकं पुन्हा स्वच्छ पाण्यानं भरा.
शेवटचा टप्पा: ‘ही’ ट्रिक देईल बर्फासारखा गारवा!
आता खरी कमाल इथेच आहे.
एक भांडं घ्या, त्यात पाणी आणि थोडं मीठ मिसळा. या पाण्यात स्वच्छ कापड भिजवून, ते मडक्याभोवती गुंडाळा.
ही छोटीशी ट्रिक मडक्याच्या बाहेरील भागाला सतत ओलसर ठेवते. त्यामुळे बाष्पीभवन (evaporation) वेगानं होतं आणि पाणी नैसर्गिकरीत्या जास्त थंड होतं.
खरंच काम करते का ही पद्धत?
ही पद्धत इंटरनेट आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असली तरी यामागे पारंपरिक अनुभव आणि काही प्रमाणात वैज्ञानिक कारणंही आहेत. योग्य पद्धतीनं मडकं वापरलं, तर ते फ्रिजपेक्षा अधिक नैसर्गिक आणि आरोग्यदायी थंड पाणी देऊ शकतं.
येथे पाहा व्हिडीओ
महत्त्वाची सूचना
या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील दाव्यांवर आधारित आहे. याची अचूकता हमखास असल्याचा दावा करता येत नाही. त्यामुळे स्वतः खात्री करून घ्या.
