Matki Dal Health Benefits: दुपारचं किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागते का? सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेवणात प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत होऊ शकते. यासाठी रोजच्या ताटात असलेल्या डाळींकडे नक्कीच लक्ष देता येईल. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच वापरल्या जातात. मात्र मटकी अनेकदा दुर्लक्षित केली जाते. आकाराने लहान असलेली मटकी ही कडधान्याचा प्रकार आहे आणि पोषक घटकांनी समृद्ध आहे. यात प्रोटीन, फायबर, आयर्न आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.
मटकी वारंवार भूक लागण्यावर ठरू शकते उपयोगी?
आयुष चिकित्सक डॉ. राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मटकी प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. शरीरातील स्नायूंची देखभाल करण्यासह अनेक महत्त्वाच्या शारीरिक प्रक्रियांमध्ये प्रोटीनची भूमिका असते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश केल्याने प्रोटीनचे सेवन वाढवण्यास मदत होऊ शकते. याशिवाय मटकीमध्ये फायबर असते. जेवणात पुरेशा प्रमाणात फायबर असल्यास पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच काहीतरी खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत मिळू शकते.
पचनासाठीही फायदेशीर ठरू शकते
फायबर हे पचनसंस्थेसाठी महत्त्वाचे पोषक घटक आहे. आहारातून पुरेसे फायबर मिळाल्यास पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे मटकी योग्य पद्धतीने शिजवून संतुलित आहाराचा भाग म्हणून खाता येऊ शकते. मात्र डाळी खाल्ल्यानंतर काही लोकांना गॅस, पोट फुगणे किंवा अपचन यासारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी सुरुवातीला कमी प्रमाणात मटकीची डाळ खावी आणि शरीराला ती कितपत मानवते हे पाहावे.
आयर्न आणि मॅग्नेशियमही मिळते
मटकीमध्ये आयर्न आढळते. शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्नची गरज असते. त्यामुळे संतुलित आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच मटकीत मॅग्नेशियमसारखी खनिजे देखील असतात. शरीरातील अनेक सामान्य जैविक प्रक्रियांमध्ये मॅग्नेशियमची भूमिका असते. त्यामुळे रोजच्या आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा समावेश केल्याने आहार अधिक पौष्टिक करण्यास मदत होऊ शकते.
किती खावी?
मटकी आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते, पण कोणताही एक पदार्थ संपूर्ण आहाराची जागा घेऊ शकत नाही. संतुलित आहारात डाळ, कडधान्यासोबत भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, पुरेसे पाणी आणि आवश्यकतेनुसार इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. तसेच मटकी खाल्ल्यानंतर वारंवार गॅस, पोटदुखी किंवा अपचन होत असेल तर तिचे प्रमाण कमी करावे आणि गरज असल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
