Mehendi Stain Removal Hacks: महिलांना मेहंदी लावण्याची खूप आवड असते आणि भारतीय संस्कृतीत मेहंदीला एक विशेष आणि पवित्र स्थान आहे. सण-समारंभ, लग्नकार्य किंवा कोणताही मोठा उत्सव असेल, तर महिलांना हातांवर मेहंदी काढल्याशिवाय त्या उत्सवाचा आनंद अपूर्ण वाटतो. हातांवर गडद रंगाची मेहंदी सौंदर्यातही भर घालते.
आजच्या आधुनिक काळात मेहंदीच्या ट्रेंडमध्ये बरेच बदल झाले असून, पारंपरिक डिझाईन्ससोबतच अरेबिक, इंडो-वेस्टर्न आणि मिनिमल डिझाईन्सची फॅशन आली आहे. हातावर उठून दिसणाऱ्या मेहंदीचा सुवास आणि तिचा गडद लाल रंग महिलांच्या आनंदाला द्विगुणित करतो. विशेषतः करवा चौथ, वटपौर्णिमा, दिवाळी किंवा लग्नसमारंभाच्या वेळी एकत्र बसून मेहंदी काढणं महिलांना खूप आवडतं. पण काही वेळा असं होतं की आपण मेहंदी काढतो आणि झोपी जातो, त्यामुळे त्याचे कपड्यावर डाग पडतात किंवा चेहऱ्यावर उमटते. ते डाग घालवण्यासाठी काय करायचं, ते जाणून घेऊयात.
कपड्यांवर मेहंदीचा डाग लागल्यास काय करावे?
आपल्या इन्स्टा हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दीप्ती कपूरने सांगितलं की, कपड्यावर मेहंदी लागल्यास सगळ्यात आधी ती कोरड्या कपड्याने किंवा टिशू पेपरच्या मदतीने हलक्या हाताने काढून घ्या. डाग जोरजोरात घासू नका, कारण यामुळे मेहंदी कपड्याच्या धाग्यांमध्ये आणखी आतपर्यंत उतरू शकते.
डाग असलेल्या भागावर २ ते ३ मोठे चमचे व्हाइट व्हिनेगर टाका आणि ते तसंच एक तासासाठी राहू द्या. एक तासानंतर ते तुम्ही वापरत असलेल्या डिटर्जंटने धुवून टाका. एवढं केल्यानंतर तुमच्या कपड्यावरील मेहंदीचा डाग पूर्णपणे निघून जाईल.
त्वचेवरील मेहंदीचा डाग कसा घालवायचा?
आपण सहसा रात्री मेहंदी लावतो आणि झोपी जातो. अशा वेळी हातावरील मेहंदी चेहऱ्यावरही लागते. दीप्ती कपूरने यावरही एक उपाय शेअर केला आहे. ती सांगते की, चुकीने हाताऐवजी तुमच्या चेहऱ्यावर किंवा इतर कुठे मेहंदी लागल्यास, सर्वात आधी एक कापसाचा गोळा घ्या. त्यावर थोडासा मेकअप रिमूव्हर टाका आणि जिथे मेहंदीचा डाग लागला आहे, तिथे हलक्या हाताने पुसून घ्या.
हे करताना त्वचा खूप जास्त घासायची नाही, यामुळे त्वचा सोलू शकते किंवा त्वचेवर जळजळ होऊ शकते. कॉटन पॅडने हळूहळू पुसून मेहंदी काढून टाका. या लहान-लहान उपायांच्या मदतीने तुम्ही कपड्यांवर किंवा त्वचेवर लागलेले मेहंदीचे डाग सहज घालवू शकता.
