Menopause and Blood Sugar : मेनोपॉज (रजोनिवृत्ती) हा महिलांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मासिक पाळी (Period Cycle) कायमची बंद होते. सामान्यतः ही प्रक्रिया वयाच्या ४५ ते ५५ वर्षांच्या दरम्यान होते. मात्र, काही महिलांमध्ये याची लक्षणे वयाच्या चाळिशीनंतरच दिसू लागतात. या काळात शरीरातील इस्ट्रोजेन (Estrogen) व प्रोजेस्टेरॉन (Progesterone) यांसारख्या हार्मोन्सची पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. हे हार्मोनल बदल केवळ प्रजननाशी संबंधित आरोग्यावरच परिणाम करीत नाहीत, तर चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम), वजन आणि रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर लेव्हल) परिणाम करतात. अनेक महिलांना मेनोपॉजदरम्यान पहिल्यांदाच रक्तशर्करा वाढणे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. सुदैवाने, योग्य काळजी घेतल्यास ही परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते.
मेनोपॉजदरम्यान अचानक का वाढते ब्लड शुगर?
‘द ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी’च्या अहवालानुसार, मेनोपॉजदरम्यान महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची निर्मिती कमी होते. इस्ट्रोजेन हे ग्लुकोज मेटाबॉलिझम आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी (इन्सुलिनची संवेदनशीलता) टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा या हार्मोनची पातळी घटते, तेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात, ज्यामुळे ब्लड शुगर वाढू लागते. संशोधनातून असे समोर आले आहे की, मेनोपॉजनंतर महिलांमध्ये टाईप-२ डायबेटिसचा (Type-2 Diabetes) धोका वाढू शकतो. त्याचे मुख्य कारण हार्मोनल बदल आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होणे हेच आहे.
इस्ट्रोजेनची कमतरता आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा संबंध काय?
‘एनसीबीआय’च्या (NCBI) अभ्यासानुसार, इस्ट्रोजेन शरीरातील पेशींना इन्सुलिनप्रति अधिक संवेदनशील ठेवण्यास मदत करते. शरीरात इस्ट्रोजेन कमी झाल्यावर रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी शरीराला अधिक प्रमाणात इन्सुलिनची गरज भासते. या स्थितीला ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ असे म्हणतात. त्याशिवाय मेनोपॉजदरम्यान पोटाच्या भागावर चरबी (Visceral Fat) जमा होऊ लागते. ही चरबी अशा काही रसायनांची निर्मिती करते, ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमकुवत होते. त्यामुळेच मेनोपॉजनंतर महिलांमध्ये रक्तशर्करा वाढल्याचे दिसून येते.
महिला कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात?
मेनोपॉज आणि उच्च प्रमाणात रक्तशर्करा असल्याची काही लक्षणे मिळतीजुळती असतात. त्यामुळे अनेक महिला या लक्षणांना सामान्य हार्मोनल बदल समजून, त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘अमेरिकन डायबेटिस असोसिएशन’नुसार, खालील लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे:
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे
वारंवार तहान लागणे
अतिशय थकवा जाणवणे
जखम बरी होण्यास जास्त वेळ लागणे
वारंवार लघवीला जावे लागणे
वारंवार इन्फेक्शन (संसर्ग) होणे
धूसर दिसणे (दृष्टी कमजोर होणे)
अति भूक लागणे
मेनोपॉजदरम्यान आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
तज्ज्ञ आणि वैद्यकीय सल्लागारांच्या मते, मेनोपॉज असो वा इतर कोणतीही आरोग्य समस्या, संतुलित आहार घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. हा आहार रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्यासह इतर आजारांचा धोकाही कमी करतो. मेनोपॉजदरम्यान रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात खालील बदल करावेत:
१. हाय-फायबर फूड्स (उच्च फायबरयुक्त पदार्थ): आहारात फायबरचे प्रमाण वाढवल्यास रक्तशर्करा नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही ओट्स, ब्राऊन राईस, तृणधान्ये, डाळी आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता. हे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत.
२. प्रथिनयुक्त आहार: संशोधनानुसार, प्रथिने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यासाठी डाळी, पनीर, टोफू, अंडी व मासे यांचा आहारात समावेश करा. त्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
३. लो-ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे: ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ती फळे रक्तशर्करा वेगाने वाढू देत नाहीत. त्यामध्ये तुम्ही सफरचंद, पेरू, नाशपाती आणि बेरीज (स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी) खाऊ शकता.
४. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ: शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची योग्य पातळी असल्यास रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही दूध, पनीर, नाचणी (रागी), बदाम, अंडी व मशरूम यांचा आहारात समावेश करू शकता.
या उपायांसह मेनोपॉजमध्ये रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या, तणाव कमी करण्यासाठी ध्यान (Meditation) करा आणि शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी रोज व्यायाम करा, तसेच काही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
