नवी दिल्ली : करोनाकाळात दोन वर्षे नागरिकांनी टाळेबंदीचा सामना केला. मात्र याचा जनतेच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जनमानसावर टाळेबंदीचा परिणाम कशा प्रकारे झाला, याबाबत अनेक अंगांनी संशोधन करण्यात आले. टाळेबंदीच्या पहिल्या वर्षी जगभरात एक लाखांवर नागरिकांचा जगभरात अभ्यास करण्यात आला. सामाजिक निर्बंधांमुळे मनोविकारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात नैराश्य जवळपास चौपट वाढले, ताण तसेच एकाकीपणाचा अनुभव मोठय़ा प्रमाणात आल्याचे अभ्यासकांनी नमूद केले. कठोर टाळेबंदी तसेच संपूर्ण टाळेबंदी नसलेल्या ठिकाणांमधील लोकांचे मानसिक आरोग्य वेगळय़ा प्रकारचे होते. वयपरत्वे यात फरक होता. वृद्धांपेक्षा तरुणांमध्ये याचे जास्त नकारात्मक परिणाम जाणवले.

याचे परिणाम पाहिले की यातून सार्वजनिक आरोग्याबाबत भविष्यात कोणत्या उपययोजना केल्या पाहिजेत याचा धडा मिळतो. टाळेबंदी फारशी कठोर नव्हती त्या वेळी आजूबाजूची परिस्थिती तसेच करोनाचा प्रसार याचा विचार करता जनतेत चिंता होती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून जनतेमध्ये योग्य संदेश जाईल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. कठोर टाळेबंदीच्या काळात जनतेत नैराश्य ही प्रमुख समस्या होती. त्यामुळे यावर उपाय म्हणून लोकांना आशावाद कसा जागवता येईल याबाबत तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. सामाजिक निर्बंध लादल्यानंतर सुरुवातीच्या काळात लक्षणे वाढण्याची भीती होती. कारण जनतेचे जीवन खडतर होते हे अभ्यासातून स्पष्ट झाले. या कालावधीत जनतेला योग्य संदेश देणे तसेच त्यांचे आयुष्य सुखकर कसे होईल यासाठी हस्तक्षेप करणे महत्त्वाचे होते. विशेषत: शाळकरी मुलांसाठी हे महत्त्वाचे आहे. कुटुंबात सुसंवाद राखणे तितकेच गरजेचे होते. यातून जीवन अधिक सुखकर होईल मदत होईल. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लादणे ही यंत्रणेची गरज असेल, मात्र जनतेचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य जपणेही महत्त्वाचे असल्याचे अभ्यासातून स्पष्ट होत आहे.